वाशिम : प्रजासत्ताक (लोकशाही) शासन व्यवस्थेत-विधीमंडळ लोकसभा, राष्ट्रपती आणि न्यायव्यवस्थेनंतर, जनता व शासन यांचा दुवा साधणारा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारीतेला ओळखल्या जाते.आणि म्हणून प्रजासत्ताक लोकशाहीत पत्रकाराला महत्वाचे स्थान आहे. पत्रकार हा समाजाचा अत्यावश्यक घटक असतो. समाजाच्या डोळ्यातील अश्रू टिपून आपल्या लेखणीद्वारे अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याची जबाबदारी पत्रकारावर असते. युद्धात लढणार्या सैनिकाजवळ मातृभूमिच्या रक्षणासाठी ज्याप्रमाणे शस्त्र किंवा तलवारीला धार असणे आवश्यक असते. अगदी त्याचप्रमाणे पत्रकाराच्या लेखणीलाही धार असावी लागते. म्हणूनच भारतीय स्वातंत्रकाळात पत्रकाराच्या लेखणीने प्रत्यक्ष युद्धातील शस्त्रापेक्षाही अजोड कामगीरी केल्याचा उल्लेख आढळून येत असतो . पत्रकार हा मुळातच सच्चा देशभक्त आणि समाजसेवक असल्यामुळे पत्रकाराची आचारसंहिता म्हणजे तो निष्पक्ष, निर्भिड, निधर्मी आणि निःस्वार्थ असावा लागतो. परंतु दुदैवाने आज,स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून आयुष्यभर पत्रकारिता करणारा पत्रकार हा वंचितच राहील्याचे दिसून येते. याला जबाबदारही स्वतः पत्रकारच आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पत्रकाराच्या अनेक परिषद, संघ,संघटना असल्यातरी त्यांना त्यांचे न्याय्यहक्क आजपर्यंतही मिळाले नाहीत. त्याचे कारणही तसेच आहेत. पत्रकार पत्रकारामध्ये चढाओढ ही असतेच. पत्रकारामध्ये कितीही मतभेद असले तरी चालतील परंतु मनभेद हे नसले पाहीजेत. पत्रकारीता करतांना स्पर्धा चढाओढ कितीही करा. पत्रकार संघटनाही वेगवेगळ्या असू द्यात परंतु आपल्या न्याय्य हक्कासाठी पत्रकारामध्ये आपसात मात्र एकोप्याचे सलोख्याचेच संबंध असले पाहीजेत. पत्रकार संघटना वेगळ्या असल्या म्हणून काय झाले ? परंतु एखाद्या पत्रकारावर संकट ओढवले. एखाद्या पत्रकारावर अन्याय अत्याचार होत असला तर प्रत्येक पत्रकार आणि प्रत्येक संघटनेने धाऊन जायलाच हवे. तसेच पत्रकाराने पत्रकाराची मानहानी, अपमान करणे इष्ट होणार काय ? असा प्रश्न स्वतःच्याच अंतःकरणाला विचारायला हवा. राजकारण करणे हा पत्रकाराचा धर्म नव्हे. राजकारणच करायचे तर तेथे स्वार्थ आला. भ्रष्टाचार आला. सच्चा पत्रकार राजकारण करूच शकत नाही. त्यामुळेच पत्रकाराने पत्रकाराशी विरोधाभास करु नये. जोपर्यंत पत्रकाराची आचारसंहिता पत्रकाराला कळणार नाही. तोपर्यंत त्याचे ऐक्य होऊच शकणार नाही आणि त्याला त्याच्याच न्याय्य हक्कापासून वंचित रहावे लागणार आहे. असे मत श्री गुरुपोर्णिमेच्या पर्वावर, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त, ज्येष्ठ साहित्यीक तथा पत्रकार संजय कडोळे यांनी प्रसार माध्यमाकडे व्यक्त केले आहे.