गेल्या काही दिवसांपासून राज्यात खुनांच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशातच आज नाशिक, जालना जिल्ह्यातून हत्येच्या घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीत एका युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
नाशिकमध्ये तरुणाची हत्या
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकमधून एक मोठी घटना समोर आली आहे नाशिकच्या म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीत एका युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रशांत अशोक तोडकर (वय २८, रा.आदर्शनगर ,रामवाडी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबतची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव म्हसरूळ पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे व गुन्हे शोध पथकाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या हत्येमागचे कारण अद्याप समोर आले नसून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
जालन्यात शेतकऱ्याचा खून
जालना जिल्ह्यातील नेर येथे शेतीच्या वादातून कुऱ्हाड व कोयत्याने वार करून एका 38 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा खून झाल्याची घटना घडली. संतोष किसन उफाड असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, शेतीच्या जुन्या वादातून हा खून झाला. दरम्यान या संदर्भात जालन्यातील मौजपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात संशयित आरोपींना अटक केली आहे.