चंद्रपूर : पाणी हे जीवन आहे. त्यामुळे पाणी नसेल तर जगणे असह्य होते. गोंडपिंपरी तालुक्यातील हेटी नांदगाव येथील कहाणीच निराळी आहे. या गावात पाणीच नसल्याने पोरगी देण्यास धजावत आहेत. केवळ पाण्यासाठी विवाह थांबले आहेत. या गावातील पाणी समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी शिवसेना नेत्या प्रा. शिल्पा बोडखे यांनी केली आहे.
गावापर्यंत आलेली जलवाहिनी फुटलेली आहे व अनेक भागांमध्ये नळच येत नाही. विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे नाल्यात खड्डा करून ग्रामस्थांना तहान भागवावी लागते. महिलांचा संपूर्ण दिवस पाणी गोळा करण्यात जातोय. त्यामुळे कोणीही इथल्या तरुणांना मुलगी द्यायला तयार नाही. याबाबत वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून सुद्धा कानाडोळा केला जातो. गावात नळ नाही. त्यामुळे टाकीत पाणी नाही. टाकीत जाणा-या पाण्याची पाईपलाईन ठिकठिकाणी फुटल्यामुळे शुद्धीकरण केलेले पाणी जरी पाठवत असतील तरीही गढूळ पाणी येते. त्यामुळे गावातील लोकांना फिल्टर तसेच पाणी शुद्धीकरण मशीन बसवून जर पाणी स्वच्छ शुद्ध करून दिले असते तर लोकांना स्वच्छ पाणी प्यायला मिळु शकते आणि पाण्याची समस्या मिटू शकते. पाणीटंचाई सोबतच या गावामध्ये सध्या अनेक सामाजिक प्रश्न सुद्धा निर्माण झालेले आहेत.
पाणीच नसल्यामुळे या गावातल्या मुलांची लग्न सध्या जुळत नाहीत. याचा पाठपुरावा सातत्याने इथले गावकरी करतात. मात्र, पाठपुरावा करून सुद्धा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा दिलासा या गावकऱ्यांना मिळु शकला नाही. अशा परिस्थितीत तेथील महिलांना पाणी गोळा करावे लागते व त्यामुळे प्रशासनाने येथील गावक-यांच्या समस्यांची दखल घेत हा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा अशी मागणी शिवसेना पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक व विभागीय प्रवक्ता प्रा. शिल्पा बोडखे, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे, महिला जिल्हा संघटिका उज्वला नलगे यांनी केली आहे.