वाशिम : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत १ लक्ष १० हजार ५३२ लाभार्थी महिलांनी अर्ज सादर केले आहेत.
महिला व बाल विकास विभागातर्फे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’मध्ये २१ ते ६५ या वयोगटातील विवाहीत, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटूंबातील केवळ एक अविवाहित महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये इतकी रक्कम आधारलिंक असलेल्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी नारीशक्ती दूत ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुध्दा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
आजपर्यंत (दि.१९ जुलै) ३४ हजार ६५१ अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले असून ७५ हजार ८८१ अर्ज ऑफलाईन प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक कारंजा तालुक्यात ३२ हजार २०२ अर्ज प्राप्त झाले आहेत.
वाशिम तालुक्यात २२ हजार २९५, मालेगाव तालुक्यात १५ हजार २८४ , रिसोड तालुक्यात ११ हजार ६९८, मानोरा तालुक्यात ११ हजार ८९५ मंगरूळपीर तालुक्यात १३ हजार ८९० तसेच वाशिम शहरी भागात ३ हजार ३४८ असे एकुण १ लक्ष १० हजार ५३२ अर्ज सादर करण्यात आले आहे.
महिलांचे आर्थिक, सामाजिक पुर्नवसन करण्यासोबतच त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली असून महिला आणि त्यांच्यावर अवलंबुन असलेल्या मुलांना आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा घडवून आणणाऱ्या या योजनेमध्ये महिलांनी आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन महिला व बालविकास विभागामार्फत करण्यात आले आहे.