वाशिम : गेल्या पाच वर्षापासून, वयोवृद्ध लोककलावंताना शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून,राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक कलाकार योजनेचे मानधन आजतागायत दरमहा त्यांच्या बँक खात्यात अचूक वेळेवर दिले जात होते.मात्र लोकसभा निवडणूका सुरू झाल्या व आचार संहिता लागली. पुढे निवडणूकही पार पडल्यात मात्र या राजकारणाच्या रणधुमाळीत,जर्जर वयोवृद्ध व दुर्धर आजारग्रस्त असलेल्या तळागाळातील लोककलावंताचे दरमहा देय असणारे मानधन मात्र मार्च 2024 पासून थकीत (रोखून) ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे वृद्धकलावंताना उपासमारीला तोंड द्यावे लागत असून त्यांचा भाकरीचा संघर्ष सुरू झाला आहे. तरी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,दोन्ही उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार तथा देवेन्द्रजी फडणवीस, राज्यसभा खासदार अशोक चव्हाण तथा सांस्कृतिक मंत्री सुधिरजी मुनगंटीवार इत्यादींनी लोककलावंताना वृद्धापकाळी कराव्या लागणाऱ्या संघर्षाची दखल घेऊन वृद्ध कलावंत मानधनाकरीता तातडीने निधी मंजूर करून घेऊन,सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे सर्व जर्जर वयोवृद्ध दुर्धरआजारग्रस्त लोककलावंताच्या बँक खात्यामध्ये मार्च 2024 ते मे 2024 पर्यंतचे गेल्या तिन महिन्याचे मानधन जमा करण्यात यावे.अशी मागणी करण्यात आलेली असल्याचे विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त जनसेवक, संजय कडोळे यांनी कळवीले आहे.