अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी चंद्रपूर व गडचिरोलीच्या जंगलातील सागवान लाकडाचा उपयोग केला जाणार आहे. श्री राम नवमीच्या पावनपर्वावर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातून पवित्र सागवान काष्ठाची भव्य शोभायात्रा चंद्रपूर येथे काढण्यात येणार आहे.
चंद्रपूरहून श्रीरामजन्मभूमी मंदिरासाठीचे सागवान काष्ठ हे विधिवत पूजन करून भव्य शोभायात्रेने वाजत गाजत रवाना करण्यात येणार आहे.
ही शोभायात्रा दोन भागात होणार आहे. विशेष म्हणजे या शोभायात्रेत दिल्लीतील कर्तव्य पथावरील (लाल किल्ला परेड) प्रजासत्ताक संचलनात पारितोषिक प्राप्त महाराष्ट्राचा "नारीशक्ती - साडेतीन शक्तीपिठे"हा चित्ररथ सहभागी होणार आहे. तसेच या शोभायात्रेत महाराष्ट्रातील विविध लोककलांचे मनोहरी सादरीकरण करण्यात येणार असून या शोभायात्रेत जग प्रसिद्ध रामायण धारावाहिकेत प्रभू रामाची भूमिका करणारे अरुण गोविल, माता सीतेची भूमिका करणाऱ्या दीपिका चिखलिया व लक्ष्मणाच्या भूमिकेला मूर्तरूप देणारे सुनील लहरी यांची उपस्थिती राहणार आहे.
एकूण 43 प्रकारच्या लोककला, रणवाद्य, योग मल्लखांब, दिंडी, लेझीम, आदिवासी कलाप्रकार, ढोलपथके, ध्वजपथके यांचे सादरीकरण या शोभायात्रेत करण्य़ात येणार आहे. यात कोकणातील दशावतार पासून गणगौर, तारपा, असे सर्वदूरचे कलाप्रकार असतील. स्थानिक एक हजार तर महाराष्ट्रभरातून 1100 असे एकूण 2100 कलाकार हे सादरीकरण करणार आहेत. "एक भारत श्रेष्ठ भारत" या संकल्पनेवार आधारित विविध सादरीकरणे देशभरातून विविध प्रांतातून आलेले कलाकार करणार असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.