चंद्रपूर : येथील कोळसा व्यापारी नरेश जैन यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने एअर अॅम्ब्युलन्स चंद्रपूरच्या मोरवा विमानतळावर दाखल झाली. मात्र, रात्र असल्याने रुग्णवाहिका धावपट्टीवर उतरू शकली नाही. त्यामुळे दोन वेळा प्रयत्न करूनही रुग्णवाहिका रुग्णाला न नेता परत गेली.
चंद्रपूर येथील कोळसा व्यापारी नरेश जैन यांना शनिवारी सायंकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. येथील डॉ. रोहन आईंचवार यांचा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी एअर अॅम्ब्युलन्स बोलवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नागपूर विमानतळाशी संपर्क साधण्यात आला. रुग्णवाहिकेसाठी निधीही जमा केला गेला.
आमदार किशोर जोरगेवार, खासदार बाळू धानोरकर यांनी मोरवा येथील धावपट्टीवर रुग्णवाहिका उतरवण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याशी संपर्क साधला. तसेच परवानगी मिळविण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. त्यानंतर रुग्णवाहिका मोरव्याला आली. मात्र, तोपर्यंत अंधार पडला होता. त्यामुळे धावपट्टीवर रुग्णवाहिका उतरवणे शक्य नव्हते. पायलटने दोन वेळा रुग्णवाहिका उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अपयशी ठरले. अखेर रुग्णवाहिका नागपूरकडे रवाना झाली. दरम्यान, रुग्णाची प्रकृती सुधारत असल्याचे पाहून डॉक्टरांनी रुग्णवाहिकेतून रुग्णाला नागपूरला नेले. अंधारामुळे रुग्णवाहिका धावपट्टीवर उतरू शकली नसल्याचे जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी सांगितले.