चंद्रपूर, दि.23 : आदिवासी विकास विभागाकडील केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजने अंतर्गत वैयक्तीक व सामुहिक लाभाच्या विविध योजनांकरीता सन 2025-26 पासून nbtribal.in ही ऑनलाईन अर्ज प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे.
सन 2025-26 या वर्षात केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत प्रकल्प कार्यालय, चंद्रपुर यांच्या कार्यक्षेत्रातील चंद्रपुर, बल्लारपुर, राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी, पोंभुर्णा, मुल, सावली व सिंदेवाही या तालुक्यातील अनुसुचित जमातीच्या तसेच आदिम जमातीच्या शेतकरी/बेरोजगार लाभार्थी तसेच बचत गटांकरीता उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने व स्वयंरोजगाराभिमुख विविध योजना राबविण्या करिता इच्छुक गरजु पात्र लाभार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.
सदर योजनेकरीता अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 15 जुलै 2025 पर्यंत होती. परंतु ऑनलाईन अर्ज करतांना दुर्गम भागात काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याने आयुक्त, आदिवासी विकास विभाग यांनी 31 जुलै 2025 पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे.
कोणत्याही कारणाने ऑनलाईन अर्ज करावयाचा राहून गेलेल्या इच्छुक आदिवासी नागरिकांनी/लाभार्थ्यांनी विविध योजनेकरीता nbtribal.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरुन लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.