आजचा तरुण हा व्यसनात तल्लीन झाला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की, झाला गर्क कसा व्यसनात । ऊठ रे ऊठ तरुणा दे हात ।।" महाराज तरुणांना त्यांचा हात मागतात. ते म्हणतात , तु या देशाचा नवतरुण आहेस. व्यसनाचे मागे लागू नकोस. ही वेळ आता कुठेही थांबायची नाही. व्यसन अशी गोष्ट आहे की, कुलूप लावून कुलपाची चाबी फेकून देणे होय. व्यसनी मित्र असले म्हणजे त्यांच्या मोहजालात पडून आपले आयुष्य वाया घालवतोस. हा मनुष्य जन्म आपणास ८४ लाख योनी भोगून मिळाला तो तू व्यर्थ घालवू नको. तुमच्या मेंदूची किंमत ५ कोटी, दोन्ही डोळे ४ लाख, सर्व दात १५ हजार, दोन्ही फुफ्फुसे ५० हजार, दोन्ही किडणी ४ कोटी, मोठे आतडे ८ कोटी रुपयाची आहे. तुझी ३१ करोडची प्राॕपर्टी असून तू व्यसनाच्या आहारी जातोस.
चोरी करायला कशाला शिकला रे?
दारु पिण्याला कशाला शिकला?।।धृ।।
दारुच्या आहारी तू गेल्यामुळे दारु पिण्याला तुला पैसे पाहिजे म्हणून चोरी करुन आपले व्यसन करीत असतो. तू चोरी करायला कशाला शिकला असे महाराज म्हणतात. चोरी म्हणजे दुसऱ्याच्या परवानगी शिवाय त्याची मालमत्ता, वस्तू चोरुन नेणे होय. चोरी करणे हा एक गुन्हा आहे. गौतम बुद्ध म्हणतात की, "प्राणघात, चोरी, व्यभिचार हे तीन शारिरीक पाप आहे." उदाः- जर तुम्ही मित्राच्या परवानगी शिवाय त्याची गाडी घेऊन गेलात, तर ते चोरीचे उदाहरण असू शकते. चोरी करणे महापाप आहे. चोरी केल्याने जीवनातील सर्व पुण्यकर्म नाहिसे होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की, दारु पिण्याला कशाला शिकला? दारु पिवू नये कारण त्याचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्तरावर अनेक नकारात्मक परिणाम होतात. दारु पिण्यामुळे अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते. तसेच व्यसन आणि इतर समस्या देखील निर्माण होऊ शकतात. दारुमुळे कर्करोग होतो. दारुने चिंता, नैराश्य आणि अन्य मानसिक समस्या वाढते. आम्ही लहानपणापासून बघतो आहे की, दारुमुळे उध्वस्त झालेली कुटूंब बघितली. दारु पिवून बायकोला मारहाण करतो. पगाराचे दिवशी जीवनावश्यक गोष्टीसाठी लागणारे पैसे दारुत उडवतो, शिव्या देतोस. दारु पिवून मेल्यानंतर त्या दारुड्याच्या बायका घरकाम करून रोज खडतर जीवन जगत आपल्या मुलांना कसे सांभाळतात. हे सर्व आपण बघत असतो.
करी शेतात काम, काढी अंगात घाम ।
घेई देवाचे नाम ।
दूर सारी हा आळस, खोकला रे ।।१।।
शेतात काम केल्यामुळे तुमचे शरीर गरम होते, तेव्हा तुमच्या घामाच्या ग्रंथी तुमच्या शरीराला थंड करण्यासाठी घाम निर्माण करतात. तसेच व्यायाम करताना तुमचे शरीर गरम होत असताना घाम निर्माण होतो. काम केल्यामुळे शरीराचे तापमान वाढते. आपले शरीर थंड होण्यासाठी घाम येत असतो. घाम येण्याचे कारण म्हणजे चिंता, तणाव सुद्धा असू शकते. काम करताना जर देवाचे नाम घेतले तर बरे होईल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, "कामात लक्ष रामावरी, ठेव अंतरीचे ।।" देवाचे नाम महत्त्वाचे आहे कारण ते आपल्याला आठवण करुन देते की, देवच शेवटी सर्वकाही सांभाळतो. कामे केल्यामुळे आपला आळस, खोकला दूर करीत असतो. आळस म्हणजे कोणत्याही कामाला किंवा त्यात रमून राहण्यास असलेला उत्साह किंवा इच्छा नसणे किंवा त्यात झोकून जाण्याचा असलेला कंटाळा. काहीही काम करण्याची इच्छा नसणे, शरीर झोपेतून उठले म्हणजे आळस येतो. आळस हा कोणतेही काम करु देत नाही. आळस येऊ नये यासाठी नियमित व्यायाम, चांगला आहार, पुरेशी झोप, कामाची योजना, सकारात्मक विचारसरणी महत्त्वाची आहे. व्यायाम, कामे केल्यामुळे शरीर व मन आनंदी राहतात. आळस कमी होतो. योगा, ध्यान केल्यामुळे आळस नाहिसा होतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, "ऊठ गड्या दिवस निघाला, रामधून आली घराला ।।" आपण झोपेतून ऊठल्यावर खोकला येतो, वातावरणातील बदलामुळे खोकला येत असतो. पुढे राष्ट्रसंत म्हणतात की, "जसा नाम मुखाने गासी रे । तसा सुधर गड्या आपणासी ।।" देवाचं नाव सकाळी उठून घेतले की आळस, खोकला दूर पळतो. राष्ट्रसंत म्हणतात, तू दारु पिण्याला कशाला शिकला? दारु पिवू नये. व्यसनी मित्रापासून दूर रहा.
गावी आलं भूदान, वाढलं कष्टाचं रान ।
भूमिसम - प्रमाण ।
आता मजुरांचा हंगाम पिकला रे ।।२।।
भूदान म्हणजे जमीन दान करणे. भूदान चळवळ ही विनोबा भावे यांनी सुरु केली. भूदान ही एक सामाजिक कृती चळवळ होती. यामध्ये जमीन मालकांना गरीब आणि भूमिहीनांना जमीन देण्यात प्रवृत्त केले जात होते. या भूदानामुळे समाजात समानता, न्याय प्रस्थापित करण्यात मदत झाली. गरीब लोकांना जमिनीचे हक्क मिळताच मदत झाली. सर्वांना सम प्रमाणात भूमि मिळावी हा एकमेव उद्देश होता. सर्वांना जमिनी मिळाल्याने कष्ट करणाऱ्याचं काम वाढलं. राष्ट्रसंत म्हणतात, आता मजुरांचा हंगाम पिकला रे. शेतीचा हंगाम म्हणजे वर्षातील विशिष्ट कालावधी ज्यामध्ये पिकांची लागवड, काढणी केली जाते. कष्ट करुन पैसे कमवितोस आणि दारु मध्ये गमावतोस. तू दारु पिवू नकोस.
गड्या ! ईमानाला जाग, सेवाकार्याला लाग ।
देवा सद्बुद्धी माग ।
करु नकोस खोट्यांच्या नकला ।।३।।
ईमान म्हणजे विश्वास किंवा आस्था दर्शविणारा एक सर्व समावेशक विचार आहे. ज्यामध्ये फक्त श्रद्धा नाही तर आचरण आणि कृत्यांचाही समावेश होतो. ईमानदार व्यक्ती कधीच खोटं बोलत नाही किंवा इतरांना फसवण्याचा प्रयत्न करत नाही. राष्ट्रसंत म्हणतात, "ईमानदारी प्रीय तयाला, सदाचार आवडे । गरीब जनांचे रक्त शोषिता क्रोध हरीला चढे ।।" प्रामाणिकपणा म्हणजे ईमानदारी होय. ईमानदारी असली की, सेवाकार्य बरोबर घडते. सेवाकार्य म्हणजे लोकांना मदत करणे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणे हे काम समाजात चांगले बदल घडवण्यासाठी आणि इतरांना मदत करण्यासाठी केले जाते. ईमानदारी असली की, सेवाकार्य समाजात घडते. सेवाकार्य आपल्या हातून सदासर्वदा घडावी म्हणून देवाला तू सद्बुध्दी म्हणजेच चांगले विचार आणि चांगले कृत्य करण्याची क्षमता मागावी. जेणेकरुन व्यक्ती योग्य मार्ग निवडू शकेल आणि वाईट गोष्टीपासून दूर राहू शकेल. वाईट गोष्टी टाळणे, सत्य बोलणे, दुसऱ्याची मदत करणे म्हणजे सद्बुध्दी होय. पुढे राष्ट्रसंत म्हणतात की, खोट्यांच्या नकला करु नकोस. खोटे बोलू नये असे आपल्याला शिकविले जातात पण आपण सगळेच सर्रास छोटं, मोठं खोटं बोलत असतो. दुसऱ्याची नक्कल करु नये. उदाः- जंगलात एक मनुष्य फिरत असताना त्याला समोरचे दोन पाय नसून मागच्या दोन पायाने टणक टणक उड्या मारणारा कोल्हा दिसला. काही वेळाने सिंहाने त्याला मासाचा तुकडा आणून त्या कोल्ह्यासमोर टाकला. सिंह त्याला रोज मासाचा तुकडा आणून टाकत असे. मनुष्याला वाटले की, हा कोल्हा उपाशी राहत नाही. जर आपण परमेश्वराचे नामजप एका खडकावर बसून केला तर देव आपल्याला खायला नक्कीच आणून देईल. तो मनुष्य ध्यान साधना करायला बसला. चार दिवस लोटले पण देवाने त्याला खायला आणून दिलेच नाही. तो दगडावर बेशुद्ध होऊन पडला. तेथून एक संन्यासी साधू जात होता. त्याने त्याला उठविले पाणी पाजले. का बरं तु बेशुद्ध होऊन पडला. तो साधूला म्हणाला तो दोन पाय नसलेला कोल्हा असून त्याला सिंह मासाचा तुकडा आणून देतो. तर मला देव का बरं उपाशी ठेवतो. अरे मुर्ख माणसा दुसऱ्याची नक्कल करुन पोट भरत नाही. तुला काही तरी कर्म करावे लागेल तेव्हा तुला भूक भागविता येईल. भूक भागली की नामस्मरण कर. हे उदाहरण देऊन सांगायचे आहे की, खोट्यांची नकल करु नये आणि खोट्यांची नकल करता करता तू दारु प्यायला शिकला. तु दारु पिऊ नकोस.
बेड्या पडल्या हातात, लाथा जोड्यांचा खात ।
घातला जाशिल जेहलात ।
सारे म्हणतील गावातून हाकला रे ।।४।।
दारुला पैसे कमी पडतात म्हणून चोरी करायला शिकला. गावात हातभट्टीची दारु काढायला शिकला. पोलीस येऊन तुझ्या हातात बेड्या टाकतील. लाथा, जोड्यांचा मार खावा लागेल. तुला जेहलात टाकल्या जाईल. मग तुला चोरी, दारु पिण्याचे हाल काय होतात ते आठवतील. आपण करतो ते बरोबर नाही. दारु पिणाऱ्या व चोरी करणाऱ्या व्यक्तीला लोक गावातून हाकलून द्यायला मागे पुढे पाहणार नाही. म्हणून तू चोरी करु नकोस. दारु पिण्याचे व्यसन सोडून दे.
दारु येता अंगात, जाऊन पडशिल नाल्यात ।
माशा घुसतील तोंडात ।
सारा मैलानं न्हाऊन रंगला रे ।।५।।
दारु पिणाऱ्याचे हाल कसे होतात. हे आपण पाहिलेले आहेतच. अती प्रमाणात दारु पिवून त्याला रस्त्याने चालता सुद्धा येत नाही. कुत्रे तर त्याला भिऊन पळतात. चालता चालता तो नालीत जाऊन पडतो. हाता पायाला जखमा होतात. माशा तोंडावर बसतात. घाणीचे साम्राज्य असलेली नालीतील घाण पाण्याने तो न्हावून निघतो. एखाद्या कुत्रा येऊन त्याच्या तोंडावर लघवी करुन जातो. अशी हालत दारु पिणाऱ्याची होते. घरी दरिद्री अवस्था येते. बायको मुलांची गैरसोय होते. तरी दारु सोडायला तो तयार नाही. कितीही उपदेश केला तरी तो दारुला सोडत नाही. ऐक राज्या तू दारु पिण्याचे सोड असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात.
ऐक तुकड्याची हाक, नको गमावू नाक ।
होईला जीवनाची राख ।
राही कीर्तीने जगात चांगला रे ।।६।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारु पिणाऱ्या, चोरी करणाऱ्या मनुष्याला सांगतात, तुझे समाजात असलेले स्थान चोरी करुन, दारु पिवून तुझे नाक गमावू नकोस. उदाः- शूर्पणखा लक्ष्मणास विवाह कर असे म्हणते. तसेच रागाच्या भरात शूर्पणखा सितेबद्दल अपशब्द बोलते आणि सितेला खाण्याची धमकी देते. लक्ष्मण सितेच्या बचावासाठी येतो आणि रागाच्या भरात शूर्पणखाचे नाक कापतो. नाक कापणे म्हणजे अपमानित करणे होय. दारुचे व्यसन लागल्यामुळे तू तुझे नाक गमावून बसला आहे. जीवनाची राख होऊ देऊ नकोस. काय आहे आपल्या जीवनात शेवटी होणार आपली राख. जोपर्यंत आपले जीवन आहे. तोपर्यंत आपण आनंदात राहू. "मरावे परी कीर्ती रूपे उरावे" मोठेपणा सर्वांना हवा असतो. पण त्यासाठी झिजण्याची कुणाचीच तयारी नसते. प्रत्येकाच्या जीवनात मोठं होण्याची इच्छा असते. तर गुणांनी मोठे होण्याचा ध्यास घ्यावा. आपले कर्म हीच आपली ओळख आहे. कीर्ती म्हणजे प्रसिद्धी, यश, नावलौकिक किंवा प्रतिष्ठा या सारख्या विविध अर्थानी वापरला जाणारा शब्द आहे. चोरी आणि दारु पिऊच नये असे राष्ट्रसंत सांगतात.
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....