श्रीकृष्ण माणसाला उद्देशून सांगतात की, कर्म करणे हा तुझा अधिकार आहे. त्याच्या फळाचा नाही तर फळ मिळण्याच्या उद्देशाने कर्म करु नकोस. भगवान श्रीकृष्ण म्हणतात. १) माणसाला कर्म करण्याचा अधिकार आहे. २) कर्म फळ माणसाच्या हातात नाही. ३) कर्म फळाची आशा न ठेवता अनासक्त भावनेने माणसाने नियत कर्म करत राहिले पाहिजे.
सर्वाचे कल्याण करण्याच्या उद्देशाने विचार, आचार व कर्म आपण करतो याला सत्य असे म्हणतात. तर सत्य करणे आणि सत्याचे रक्षण करणे याला धर्म असे म्हणतात. भगवान श्रीकृष्णाचा अर्जूनावर पूरा भरोसा होता. अर्जून कोणाचे वाईट करण्याचा विचारात नव्हता किंवा कर्म करु शकत नव्हता. आपल्या स्वकिय, नातेवाईकांना सामोरे पाहून त्या स्वकियांबरोबर तो युद्ध करण्याचे कर्म करु इच्छित नव्हता. तरी श्रीकृष्ण अर्जूनाला युद्ध करावयास सांगत आहे. हे अर्जूना तू तुझे कर्म कर.
कर्माचे दोन प्रकार आहेत. सत्कर्म आणि दुष्कर्म. कोणताही मनुष्य काम केल्याशिवाय राहू शकत नाही. नुसतं काही न करता बसून राहा, कर्म बंधनातून सुटका होते असे थोडावेळ वाटते. ज्या कामाने समाधान, शांती मिळते ती सर्व सत्कर्मच आहेत. ज्यांनी नंतर पश्चाताप होतो किंवा ग्लानी येते ते दुष्कर्म. कोणतेही काम नियमित झाले की सिद्धी मिळते म्हणून कामे करावी, जी आपण रोज नियमित करु शकतो म्हणून काही न करण्यापेक्षा काहीतरी करत राहावे. चांगले की वाईट काळ ठरवेल.
कर्माचे फळ मिळाले नाही तर माणूस निराश होतो आज ह्यामुळेच अनेक शेतकरी आत्महत्या करतात. पेपरमध्ये नापास झाल्याने विद्यार्थी सुद्धा आत्महत्या करतात. लोक कर्म करणे सोडून देतात. मृत्यू लोकाला कर्मलोक असेही म्हणतात. इथे कुणालाही कर्म चुकलेले नाही. कर्म हे करावेच लागणार, त्याशिवाय या लोकांत कुणी जगू शकत नाही. श्रीकृष्ण म्हणतात की, अनासक्त भावनेने माणसाने नियत कर्म करत राहिले पाहिजे.
उदाः- कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत अडकल्यावर तो रथातून खाली उतरला, त्यावेळी तो शस्त्राशिवाय होता. श्रीकृष्णाने अर्जूनाला ताबडतोब बाणाने कर्णाला मारण्याचा आदेश दिला. अर्जूनाने परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले. जमिनीवर पडलेल्या कर्णाने श्रीकृष्णाला विचारले, हे परमेश्वरा ! हाच कां तुझा न्याय? निशस्त्र माणसाला ठार मारण्याचा तु आदेश दिलास. श्रीकृष्ण हसत हसत म्हणाले, अर्जूनाचा मुलगा अभिमन्यू देखील चक्रव्यूहात निशस्त्र होता. त्यावेळी तुही त्यात होतास, तेव्हा तुझे ज्ञान कुठे होते कर्णा? हे कर्माचे फळ आहे. जसे कर्म कराल तसेच ते भोगावे लागेल.
कर्म माझं ! असे आपण वैतागून कपाळाला हात लावून म्हणतो, तेव्हा त्याचा संबंध नशिबाशी येतो पण इथे कर्म म्हणजे काम होय. प्रत्येक सजीवाला कर्म करावेच लागतात. त्याचा श्वास हे कर्माचे प्रतीक आहे. श्वास थांबला की त्याचे कर्म थांबते. लहान मुंगी बघा, कर्माचे खरे उदाहरण तिच आहे. सतत येरझारा घालत असते. पोट तर केवढे तरी तिला तिच्या पोटाची चिंता. मग इतर जीव काय कर्माशिवाय राहतील.
जसे कर्म करु तसे फळ मिळेल म्हणतात. जे पेराल तेच उगवेल ! कर्माविषयी श्रीकृष्ण अर्जूनाला उपदेश करतात की, कुठल्याही जीव, जंतूला कर्म हे करावेच लागते. कर्माशिवाय कोणीही जिवंत राहू शकत नाही कारण जीवन जगण्यासाठी अन्न पाण्याची सोय करावी लागते. त्यासाठी त्याला कर्म करणे आवश्यक असते तसेच शरीराच्या काही क्रिया या सतत कर्म करीत असतात. कोणी कितीही म्हटले तरी कर्माशिवाय कुणी राहू शकत नाही.
दहा ज्ञानेद्रिये व कर्म इंद्रिये यांनी केलेल्या प्रत्येक कार्याची एक निश्चित परिणाम होतो. नाहक काहीही घडत नाही. आपल्या मनात आणि बाहेर जे काही घडत असते. त्यात लपवून ठेवण्यासारखं काही नाही. जसे करावे तसे भरावे. जे देऊ तेच वाढवून मिळते. अस्थिर मनाने कोणतेही काम होत नाही. मन लावून काम केले पाहिजे. खरं म्हणजे कोणतेही काम करताना ते काम आवडले पाहिजे. त्यावर प्रीती हवी. दुसरे म्हणजे फळाकडे मुळीच लक्ष असू नये, असे श्रीकृष्ण भगवान गितेत सांगतात. त्यालाच तटस्थ कर्म म्हणतात.
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोनः ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....