जिल्ह्यात मागील तिन-चार दिवसापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे तसेच लोवर वर्धा धरणाचे पाणी सोडल्याने वर्धा नदीला पूर आला असून, इरई नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.
रविवार, 23 जुलैला चंद्रपूर महानगरातील इरई नदी काठावरील रहेमनगर, सिस्टर कॉलनी व विठ्ठल मंदिर वॉर्ड परिसर जलमय झाला आहे. पुराचे पाणी अनेक नागरिकांच्या घरात शिरले.
जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नदी, नाले तुंडूब भरले आहे. दरम्यान, रविवारी चंद्रपुरातील इरई नदीकाठावर असलेल्या रहेमनगर, सिस्टर, कॉलनी, विठ्ठल मंदिर वॉर्ड परिसरातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे राजुरा तालुक्यात वर्धा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे.
रेल्वे गाड्या थांबवण्याचे आदेश
राजुरा-बामणी मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. बल्लारपूर जाण्यासाठी व राजुराकडे येण्यासाठी माणिकगड व बल्लारशाह रेल्वे स्थानकावर सर्व रेल्वेगाड्या थांबविण्याचे आदेश देण्यात आले असून, सर्व रेल्वेगाड्या थांबविण्यात येणार आहे.