वाशिम, : जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी जिल्हयात विशेष मोहिमेव्दारे मंडणगड पॅटर्न राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने या मोहिमेचे नियोजन करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुलाल व सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी मारोती वाठ यांच्या उपस्थितीत आज 21 नोव्हेंबर रोजी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय, वाशिम येथे जात वैधता प्रमाणपत्र कार्यपध्दती, मार्गदर्शन व जात वैधता प्रमाणपत्र वाटप कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाचे प्राचार्य डॉ. बालाजी गवलवाड होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. छाया कुलाल तर प्रमुख अतिथी म्हणून जिमखाना उपाध्यक्ष राहूल महाजन, जिमखाना सचिव राजेश्वर ताकवाले, तंत्रनिकेतन विद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख उदयसिंग बागडे उपस्थित होते.
प्रास्ताविकपर मार्गदर्शन करतांना डॉ. कुलाल यांनी मंडणगड पॅटर्नअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे सांगितले. त्याची संपुर्ण कल्पना उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी दिली. पीपीटीच्या माध्यमातून जात वैधता प्रमाणपत्र कार्यपध्दतीबाबत कार्यालयाचे संशोधन सहायक मनोहर तिडके यांनी माहिती दिली. शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाचे जवळपास 200 विद्यार्थी व विद्यार्थींनी या कार्यशाळेला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील जी.यू. गणोदे, स्वाती पवार, तंत्रनिकेतन विद्यालयाचे प्राध्यापक वर्ग व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. उपस्थितांचे आभार राहूल महाजन यांनी मानले. असे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद वाशिम यांना प्राप्त झाल्याचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे .