कारंजा(लाड) : कारंजाचे ऐतिहासिक आराध्य दैवत स्थानिक श्री कामाक्षादेवीचे मुख्य गोंधळी घराण्यातील "कडोळे" परिवारातील, सुप्रसिद्ध गोंधळी लोककलावंत असलेले संजय मधुकर कडोळे हे गोंधळ जागरणाकरीता पंचक्रोशीत ओळखले जातात.आपल्या गोंधळी ह्या लोककलेद्वारे ते आध्यात्मिक व धार्मिक प्रसार प्रचारा शिवाय अंधश्रध्दा आणि व्यसन निर्मूलन करीत समाजप्रबोधनावर भर देत असतात . शिवाय छत्रपती शिवराय आणि आद्य गोंधळी शूरविर तानाजी मालुसरे यांच्या कोंढाण्याच्या आक्रमण प्रसंगी घडलेल्या "गड आला पण सिह गेला . " ह्या प्रसंगावर आधारीत कार्यक्रम सादर करून, "पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रैलोकी झेंडा" हे आख्यान सादर करून ऐकणार्याच्या अंगात विरश्रीचे बळ देण्याचा प्रयत्न करतात. मुलीच्या आईवडीलांना, "मुलगी ही आईवडील आणि पतीच्या घराण्याला(सासरवाडीला ) प्रकाशमान करणारी पणती असल्याचे पटवून देत भ्रूणहत्या हुंडा देऊन विवाह करणार्यांवर आपल्या आख्यानातून प्रहार करतात . तसेच "ब्रम्हदेवापाशी पडल्या बंधन गाठी । उद्या जाशील बाई सासरीला । सोडूनी प्रिय माहेराला॥" ह्या आख्यानातून मुलीला चांगली शिकवण देतात. माहेर कडील मंडळीना आपल्या गोंधळ गीताने अक्षरशः रडविणारे समाज प्रबोधनकार संजय कडोळे जोगव्याच्या वेळी पाहुण्यांना आपल्या गीतावर अक्षरशः नाचायला भाग पाडतात. अशा प्रकारे अष्टपैलूंनी कार्यक्रम सादर करणारे समाजसेवी संजय कडोळे हे मिळालेली दक्षिणा सवंगड्याना ( जिलकऱ्यांना ) वाटून दिल्यानंतर स्वतःच्या हिश्श्याची ऊरलेली दक्षिणा मात्र समाजकार्य व श्रीक्षेत्र तुळजापूर पंढरपूर वारीकरीता वेगळी ठेऊन, निराधार, दिव्यांग वारकऱ्यांना वाटून वारीकरीता सहकार्य करीत असतात . गेल्या कित्येक वर्षापासून त्यांचा हा उपक्रम सुरु आहे हे येथे उल्लेखनिय !