कारंजा : पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या आयकर भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांकडून पीएम किसान सन्मान निधीच्या रकमेची वसुली महाराष्ट्र जमीन महसूल नियम 1967 नुसार करणे सुरू आहे. त्या अंतर्गत कारंजा तालुक्यातील 779 लाभार्थ्यांकडून ही रक्कम वसूल करण्यात येत आहे. आतापर्यंत 362 लाभार्थ्यांकडून 55 लाख 36 हजार म्हणजेच 45.70% रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी दिली आहे. अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात 1 डिसेंबर 2018 पासून राबवण्यास सुरुवात झाली.त्यानुसार 2 हेक्टर पर्यत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रती हप्ता रुपये 2000 म्हणजेच वार्षिक 6000 रुपयांचे अर्थसाह्य दिले जाते.या योजनेत पुढे केंद्र सरकारने बदल करून सरसकट सर्वांना या योजनेचा लाभ देण्याचे आदेश देण्यात आले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र शासनाने निकष शिथिल केल्याने लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शेतकरी कुटुंबासाठी 2 हेक्टरची मर्यादा रद्द केल्याने सरसकट शेतकरी कुटुंबे योजनेसाठी पात्र ठरली आहेत. शिवाय काही आयकर भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने त्यांच्याकडून या योजनेअंतर्गत घेतलेली रक्कम वसूल करण्याचे आदेश महसूल विभागाला दिल्याने त्यांच्याकडून रक्कम वसुली करणे सुरू झाले आहे. कारंजा तालुक्यात एकूण 779 आयकर भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्याकडून 1 कोटी 21 लाख 14 हजार रुपये वसूल करावयाचे आहे .आतापर्यंत त्यातील 362 लाभार्थ्यांकडून 55 लाख 36 हजार एवढी रक्कम वसूल करण्यात आली असून 417 लाभार्थ्यांकडून 65 लाख 78 हजार एवढी रक्कम वसूल करणे बाकी आहे. कारंजा तहसील कार्यालयाच्या वतीने आतापर्यंत 362 शेतकऱ्यांकडून 45.70% रक्कम वसूल केल्याने कारंजा तालुका पी एम किसान सन्मान निधीच्या वसुलीत वाशिम जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.
एम किसान योजनेच्या उर्वरित रकमेच्या वसुलीचे काम युद्धपातळीवर सुरू
"कारंजा तालुक्यात पी.एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 362 आयकर भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांकडून आतापर्यंत 55 लाख 36 हजार रुपये वसूल करण्यात आले असून 417 लाभार्थ्यांकडून 65 लाख 78 हजार रुपये वसूल करणे बाकी आहे .हे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच वसुली पूर्ण करण्यात येईल." असे तहसिल कार्यालय कारंजाचे तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी कळविल्याचे महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.