श्रीमद्भगवद्गीता एकूण सातशे श्लोकांची. एकूण अध्याय अठरा. त्यात ५७४ श्लोक कृष्णाचे, ८४ अर्जुनाचे सुरुवातीचा 'धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे' हा एकमेव श्लोक धृतराष्ट्राचा आणि ४१ श्लोक संजयाचेआहेत. महाभारत युद्धात सांगितलेल्या उपदेशाची श्लोक रूपात गीता निर्माण झाली.
गीता सांगावी,अशी परिस्थिती त्यापूर्वी हजारो वर्षांमध्ये वेळोवेळी येऊन गेली असेल. जेव्हापासून मानव जात अस्तित्वात आली, तेव्हापासून गीतेची गरज होती. याचाच अर्थ, पुढेही वर्षानुवर्षे गीतेची गरज राहणारच.
इतर प्रश्नोत्तरे आणि गीता यात मोठा फरक हा, की इतरत्र प्रश्न ठाम असतात आणि उत्तर सांगणारे गोंधळलेले असतात. येथे उलट आहे. गोंधळलेल्या अर्जुनाचे प्रश्न सुद्धा गोंधळलेले आहेत आणि सार्वकालिक कृष्णाची उत्तरे निश्चित आणि ठाम आहेत! ती सार्वकालिक आहेत,म्हणून गीता महत्त्वाची अन्यथा कृष्ण आणि अर्जुन आपल्यासारखेच हाडामासांचे देह घेऊन फिरलेल्या व्यक्ती, एवढेच समजून त्यांना सोडून दिले असते! पण तसे नाही. साऱ्या विश्वाचं विज्ञान वर्तमानात कसं जगायचं आणि त्याच्या पल्याड ज्याला वेदांत म्हणतात त्या परिपूर्ण ज्ञानात राहून वर्तमान जीवन कसं छान जगायचं,हे प्रत्येक क्षणाला गीता शिकवते.म्हणून प्रत्येकासाठी गीतेचा अर्थ आपापल्या परीने वेगळा लागतो.
आजचे सुंदर श्लोक पाहा:-
*अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम्।*
*जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत्।।।५।।*
*एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय।*
*अहं कृत्स्नस्य जगतःप्रभवःप्रलयस्तथा।।६।।*
पंचमहाभूते तसेच मन, बुद्धी, अहंकार यांनी बनलेल्या दृश्य स्वरूपातील अष्टविध अशी परमेश्वराची प्रकृती आहे.मागील श्लोकात ती आपण पाहिली.याव्यतिरिक्त या साऱ्यांच्या पलीकडे असणारी माझी दुसरी चैतन्यमय प्रकृती आहे आणि ती विविध योनींमध्ये असणाऱ्या जीवांनीयुक्त अशा जगताला धारण करते. सारं जग तिथून निर्माण होते, हे तू जाण.मीच साऱ्या जगताची उत्पत्ती आणि प्रलयसुद्धा आहे.
परमेश्वराची दुसरी प्रकृती खरंच किती जणांना पहावीशी वाटते?उघड्या डोळ्यांनी दिसणारी ही सृष्टी सर्वच डोळे उघडे ठेवून पाहतात.पण दुसरी सृष्टी डोळे बंद करून पाहायची असते.ध्यानामध्ये ती दिसते नित्य आनंदस्वरूप असलेली, कधीही नष्ट न होणारी, अशी सृष्टी पाहायला आवड असावी लागते.
परमेश्वर मोठा कलाकार आहे.इतकी सुंदरता त्याने जिथे तिथे ठासून भरली! पाहातच राहावीशी वाटेल,अशी सुरम्य सृष्टी या पृथ्वीवर सर्वत्र त्याने निर्माण केली.फुलपाखरे तरी किती प्रकारची आणि सुंदर रंगांची! झाडांची पाने,फुले, सुंदर रंगीबेरंगी पक्षी, विलक्षण सुंदर मासे, विविध वैशिष्ट्ये घेऊन जगणारे प्राणी.त्यात कोणाची शिंगे सुद्धा भारी सुंदर तर कोणाचा पिसारा स्वर्गीय रंगांची उधळण करणारा तर कुणाचा आवाज मोहून टाकणारा.असे विविधजीव,अत्यंत देखणे स्त्री-पुरुष, बुद्धीचा प्रचंड प्रभाव असणारी माणसे, असं अद्भुत जग परमेश्वराने निर्माण केलं.ते मोहून टाकतं.भुरळ पाडतं.या साऱ्या मोहून टाकणाऱ्या गोष्टींमध्ये अडकून राहण्यापेक्षा ज्याने हे सार सुंदर विश्व बनवलं आणि क्षणाक्षणाला पुढेही बनवत राहणार आहे,तो निर्माता किती सुंदर असेल हे ओळखून त्याचं आकर्षण वाटणारे अधिक बुद्धिमान ठरतात.भुरळ पाडणाऱ्या निर्मितीपेक्षा ते निर्मिती करणाऱ्याची भुरळ पडणं, हे अधिक भाग्याचे लक्षण आहे.
हा मनाचा प्रवास आपल्याला करायचा आहे.याला वेळ लागतो.परमेश्वराने निर्माण केलेल्या गोष्टी आपल्याला सतत आकर्षून घेत राहतात आणि आपण त्यामध्ये रमतो.जरूर रमावे.पण निर्मात्याला धन्यवाद देतच रमावे.तो निर्माण करतो, सांभाळतो, तसेच नष्टही करून टाकतो. म्हणून भगवान कृष्ण हेच सांगतात, की 'मी या जगाचे निर्माण करणारा, तसेच प्रलय करणारा सुद्धा आहे.'
आपल्याला हे खोल ज्ञान कसं समजावं? वेळ लागेल. पण मनात भक्ती असली,श्रद्धा असली,की आपोआपच गीतेचे श्लोक कळत जातात.
सारा भार त्या निर्मात्यावर टाकून छान कामे करत मस्त जगायचं! हे जग डोळ्यांनी पाहूनही नीट दिसत नसतं, खरं काय ते कळत नसतं! म्हणून म्हणतात, 'दिसतं तसं नसतं,म्हणून जग फसतं!'
माझ्या गावात एक भिकारी होता. तो एक साधे गाणे म्हणायचा. पण त्यात सुद्धा आता मला गीतेसारखा खोल अर्थ जाणवतो. तो म्हणायचा,
*देवा मी आंधळा भोवती अंधार*
*तारी किंवा मारी मला तुझाच आधार!*
आपण डोळे असून आंधळ्यात जमा आहोत ना? सभोवती गडद असलेल्या अज्ञानाच्या अंधारात आपण वर्षानुवर्षे अनोळखी जगात चाचपडत पुढे चालत राहतो. या अज्ञात प्रवासात सर्वांना आधार एक त्या अदृश्य कृष्णाचाच आहे !
जय श्रीकृष्ण!
*Lलेखक : श्रीनिवास राघवेंद्र जोशी, कारंजा (लाड) जि. वाशिम.
आपल्या प्रतिक्रिया द्या....