आरमोरी तालुक्यातील उसेगाव येथे डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जनविकास योजनेंतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने प्रत्येक कुटुंबाला थंड पाणी कॅनचे वाटप करण्यात आले. परंतु शिवराजपुर गट ग्रामपंचायत अंतर्गत जि. प. शाळेत उभारलेला आरओ प्लांट गेल्या पाच वर्षापासून बंद असल्याने कॅन मध्ये कुठून पिण्याचे थंड पाणी आणणार, असा सवाल नागरिक करीत आहेत. कॅन वाटप करताना सरपंच सुषमा सयाम, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानाजी सयाम, उपाध्यक्ष राजहंस चोदेले, प्रा. पं. सदस्य दीपक प्रधान, विनोद धुर्वे उपस्थित होते. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून उभारलेला आरओ प्लांट लवकर सुरू करावा, अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला.