आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ते जगता आलं पाहिजे. आपण सर्वच कधीतरी मरणारच आहोत पण मरण्याआधी जगणच विसरुन जात असतो. कधी तर वाटत आयुष्याचा काहीच फायदा नाही. जगून काय उपयोग? तरीही जीवन जगणे चालूच आहे आणि राहणारच. आत्मा आहे तोवर जीव आहे. जीव आहे तोवर सर्व माझं माझं करीत जगत असतो. "नाही रे नाही कुणाचे कुणी" शेवटी मातीत जाणार हे एक कटू सत्य माहित असून रोज जगण्यासाठी धडपड सुरुच असते. जन्मापासून मरेपर्यंत ही धडपड कशासाठी? जसे- ऊस गोड तर चिंच आंबट हा दोष ना पाण्याचा ना मातीचा. दोष बीजाचा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या अभंगात म्हणतात.
बंदे ! क्या बाते करता?
अंतमें खावेगा गोता ।।धृ।।
बंदे म्हणजे दास, सेवक, भक्त, मनुष्याला म्हटले आहे. बाते करणे म्हणजे गप्पा मारणे, बोलणे. महाराज म्हणतात, तू व्यर्थ किंवा निरर्थक गोष्टीवर बोलू नकोस म्हणजे वेळ वाया घालवू नकोस. शांत राहा आणि विचारपूर्वक बोला. गोता खाणे म्हणजे खूप त्रास होणे किंवा खूप कठीण परिस्थितीत असणे. आजकाल जीवनात खूप स्पर्धा आहे, त्यामुळे खूप लोक गोता खातात. अंत म्हणजे एखाद्या गोष्टीचा शेवट, समाप्ती. अंत म्हणजे एखाद्या गोष्टीचे पूर्ण होणे किंवा संपणे. जसे- प्रत्येक गोष्टीला सुरुवात असते, तसाच तिचा अंत किंवा शेवट निश्चित असतो. जन्म आणि मृत्यू हे या नियमाचे उत्तम उदाहरण आहे. जन्म झाल्यानंतर मृत्यू होणारच असेल तर जन्म हाच मृत्यू का मानू नये? या प्रक्रियेची सुरूवात हाच अंत मानायला काय हरकत आहे? उदा- जसे एखादे रोप उगवते, वाढते आणि मग सुकून जाते त्याचप्रमाणे माणूस जन्माला येतो आणि शेवटी मरतो. मृत्यू ही नविन जन्माची सुरूवात आहे. हा भवसागर पार करायचा असेल तर रामनामाचे नावेत बसून पैलतीर गाठावा लागेल. अन्यथा ही नाव कधीही डुबेल याचा भरवसा नाही.
संत समागम दुर्लभ भाई, रख उनसे नाता ।
मोल न होवे अमोल काया, नर क्यो भटकाता ।।१।।
संत समागम म्हणजे संताच्या सानिध्यात राहून ज्ञान आत्मसात करणे होय. संत समागम साधल्यामुळे सत्याचा अनुभव येतो. राष्ट्रसंत म्हणतात की, "संत समागम साधा, गडे हो !" संत संगतीमुळे आपल्या जीवनात बदल घडू शकतो. "नर शरीर अनमोल रे, प्राणी प्रभू कृपा से पाया है !" हा दुर्लभ मनुष्य जन्म आपल्याला भाग्याने मिळाला, तो व्यर्थ गमावू नकोस. मनाला व्यर्थ भटकू देऊ नकोस. हा मनुष्य जन्म तुला मिळाला तू व्यर्थ गमावू नकोस. तुझा श्वास अनमोल आहे. आपला श्वास रामनामाच्या जपात घाला. पशु मेल्यानंतर कामी पडतो, मनुष्य काहीच कामाचा नाही.
पुराण पोथी बाचबाचकर, मन चंचल होता ।
सद्गुरु साई भजले भाई, ना बन रे तोता ।।२।।
मन चंचल असणे म्हणजे ते एका जागी स्थिर न राहणे, सतत विचार बदलणे आणि एका गोष्टीवर लक्ष केंद्रित न करणे. ज्यामुळे व्यक्तीला अनेक वेळा त्रास होऊ शकतो. सर्व प्रकारचे पोथी, पुराण वाचून मन चंचल होते. तुला राष्ट्रसंताची ग्रामगीता योग्य मार्ग दाखवू शकेल. ग्रामगीतेतील विचार आचरणात आणून चंचल मनाला स्थिर करावे. त्यामुळे आपले मन शांत राहू शकेल. आपल्या सद्गुरुला मनोभावे शरण जा. त्यांनी दिलेला रामनामाचा जप कर. पोपटा सारखा व्यर्थ बडबड करु नकोस. सद्गुरु यांनी दिलेला नामाचा जप केल्याने सद्गुरु आपणास अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जातात. सत्य ज्ञान देऊन आत्म्याचे परमात्म्याशी जोडण्याचा मार्ग दाखवितात.
सब दुनिया का पालनवाला, सद्गुरु है दाता ।
एक चित्त कर भजले उसको, टुटे जनम ताँता ।।३।।
एक चित्त करणे म्हणजे मन एकाग्र करणे. एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे यालाच ध्यान किंवा एकाग्रता म्हणतात. सर्व सृष्टीचा पालनहार भगवान विष्णू आहेत. राष्ट्रसंत म्हणतात, "सारे दुनिया का तूही कर्णधार है, बिना तेरे ना किसी को लगापार है !" अशा परमेश्वराचे नाम घेतल्यास परत जन्म घेण्याची आवश्यकता नाही. मोक्ष प्राप्त होतो. "हरिनाम जपा मन लावूनिया, मग मोक्ष सुखा किती वेळ असे !" मोक्ष प्राप्त झाला तर जन्म मरणाची येरझार कमी होते.
कहता तुकड्यादास सद्गुरु, श्रद्धा से पाता ।
चित्त शुद्ध कर अपना प्यारे, सद्गुरु घर आता ।।४।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, सद्गुरुवर श्रद्धा, भाव ठेवला असता परमेश्वर प्राप्त होतो. आपले चित्त मलीन, गलिच्छ झाले आहे त्याला प्रथम निर्मळ कर. तेव्हाच सद्गुरु हे तुझ्या घरी येतील. चित्त स्वच्छ झाल्यामुळे मन एकाग्र होते. जसे- मिठ पाण्यात टाकले म्हणजे ते पाण्यापासून वेगळे राहते का? भगवंत हा त्राता आहे, सुख देणारा आहे अशी कल्पना आपण करु या. त्यातच खरे हित आहे. परमात्मा आपल्या कल्पनेत आणून सगुण करावा आणि तिथेच आपले चित्त स्थिर होते. संत, सद्गुरुच्या आज्ञेवर श्रद्धा ठेवा. आपल्याला काहीही कमी पडणार नाही. "संताचिया पायी हा माझा विश्वास, सर्वभावे दास झालो त्यांचा ।" संताच्या पायाची धुळ व्हावी यानेच जीवन कृतार्थ होते.
बोधः- संत तुकाराम महाराज म्हणतात, "याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा ।।" परमेश्वराची साधना आयुष्यभर केली ती याचसाठी की शेवटचा दिवस गोड व्हावा. हरिनाम घेतल्यामुळे आपला अंत झाल्यावर परत देवाने पुन्हा संधी दिली तर दुसऱ्या जीवनाची सुरुवात होईल. नाहीतर आत्मा नसलेला दगड बनून राहावे लागेल. पापपुण्य जेव्हा समान होते तेव्हाच नरतनुची प्राप्ती होते. दुर्लभ असा नरदेह मिळ्याल्यावर तो आपण सफळ केला पाहिजे. परमेश्वराने हे मानवी शरीर नराचा नारायण बनण्यासाठी आपल्याला दिलेला आहे. मग ईश्वर भक्ती, योगसाधना, ध्यानधारणा करुन मानव नराचा नारायण बनू शकतो.
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....