वाशिम : वाशिम जिल्हा निर्मिती झाल्या पासून आजतागायत सत्ताधारी पक्षाच्या किंवा इतरही कोणत्याच लोकप्रतिनिधीकडून, जिल्ह्यातील मतदारांच्या विकासासाठी जिल्ह्यात कोणतेही ठोस असे विकासात्मक कार्य करता न आल्यामुळे,येथील मतदारामध्ये सत्ताधाऱ्याविरुद्ध तिव्र आक्रोश आणि संतापाची भावना स्पष्टपणे दिसत आहे. उल्लेखनिय म्हणजे सत्ताधारी पक्षाकडून जिल्ह्याला आकांक्षित व मागास जिल्हा ठेवण्याचे षडयंत्र तर रचल्या जात नाही ना ? असा प्रश्न येथील मतदारांना भेडसावत आहे.त्याचे कारणही तसेच आहे.कारण खासदार निधीतील उल्लेखनिय कामेच दिसत नसल्यामुळे जिल्ह्यात खासदार निधी मिळतो किंवा नाही ? असा प्रश्न तर पडतोच आहे.त्याशिवाय आजपर्यंत जिल्ह्याला लाभलेले पालकमंत्री देखील केवळ स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाकरीता उपस्थिती लावतांनाच दिसतात. त्यामुळे ह्या झेंडा मंत्र्याचा जिल्ह्याच्या विकासाकरीता उपयोगच होत नाही.तसेच हे व्हि आय पी लोकप्रतिनिधी केव्हाही मतदाराच्या नजरेने विकासात्मक कामे करतांना व मतदारांमध्ये मिळून मिसळून वागतांना, जिल्ह्याच्या व मतदार शेतकरी राजाच्या समस्या सोडतांना दिसतच नाहीत.जिल्ह्यातील शेतकरी आसमानी व सुलतानी संकटाने बेजार होऊन, दुष्काळग्रस्त,कर्जबाजारी असतांनाही त्याच्या शेतमालाला हमीभाव नाही.सिंचनाची कोणतीही व्यवस्था नाही. मजूरांना रोजमजूरीचे साधन नाही. त्यांच्या मुलांकरीता उच्च शिक्षणाची सोय नाही. त्याकरीता उच्च शिक्षणाची महाविद्यालय नाहीत.सुशिक्षित बेरोजगारांना सरकारी नोकऱ्या नाहीत. औद्योगीक विकासाकरीता उद्योगधंदे इंडस्ट्रिज नसल्याने येथील कामगार मजूरांच्या हाताला काम नाही.बँका सुशिक्षित बेकारांना बँकेभोवती चकरा मारायला लावतात. शेकडो कामदपत्रे व ग्राहकांचा अनमोल वेळ घेऊन केवळ हेलपाटे देतात.परंतु प्रत्यक्षात कर्जवाटप करतच नाहीत. यांचेकडून जामिनावरच कर्ज मिळत नाही तर सुशिक्षित बेरोजगारांना विनाजामिन कर्ज काय मिळणार ? त्यामुळे दिवसेंदिवस बेकारी व दारिद्र रेषेखालील लोकांचे प्रमाण वाढत असून मतदार व्हेन्टीलेटरवर असल्या प्रमाणे आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर घेऊन कसाबसा जगत आहे.मात्र त्याला त्याच्या उदरनिर्वाहा करीता साधनच उपलब्ध होत नाही.त्यामुळे सार्वत्रिक निवडणूकीच्या निमित्ताने येथील मतदार राजा अक्षरशः संतापलेला आहे. त्यामुळे येथील मतदारामध्ये सर्वच सत्ताधारी पक्षाविरुद्ध कमालीचा आक्रोश स्पष्ट होत आहे.आतामात्र सत्तेत परिवर्तन हवेच.असा जनमताचा कौल असल्यामुळे 2024 च्या निवडणूकीत "सत्ताधारी पक्षाविरुद्ध जनमताचा कौल" असल्याचे स्पष्टपणे दिसत असून, लोकप्रतिनिधी होऊ पाहणाऱ्या सत्ताधारी राजकिय नेत्यांना ही निवडणूक जड जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.तसेच निवडणूकीतील बाहेरच्या उमेद्वारांना निवडून आणून आम्ही यवतमाळ वाशिम मतदार संघाचा कोणता विकास करणार आहोत ? तसेच आमचेवर वेळ आल्यानंतर किंवा आम्हाला खासदाराच्या शिफारशीची गरज पडली तर आम्ही मराठवाडयाच्या फेऱ्या मारायच्या काय ? असा प्रश्न सामान्य मतदार राजा विचारत आहे. उमेद्वार स्थानिक असोत किंवा बाहेरगावचे मतदाराच्या मनात एकाच्याही बद्दल आपुलकी किंवा उत्सुकता दिसत नाही. त्यामुळे यंदा मतदानाची टक्केवारी घसरण्याची देखील भिती व्यक्त होत असल्याचे अनुमान स्पष्ट दिसत आहे .