विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी कारंजा - मानोरा मतदार संघाच्या संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांचे नाव घेतले जात आहे त्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती श्रीमती सईताई प्रकाश डहाके यांचे समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा रविवार २० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता कारंजा ते मंगरूळपीर मार्गावरील शेतकरी निवास येथे आयोजित करण्यात आला आहे. श्रीमती डहाके यांचे नाव विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे. नाव चर्चेत असले नि खुद्द त्यांची ही निवडणूक लढविण्याची इच्छा असली तरी अद्याप त्यांना यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने ऑफर दिलेली नाही. काल शुक्रवारी उमेदवारीसाठी श्रीमती डहाके यांचे नाव भाजप तर्फे निश्चित झाल्याची
चर्चा शहरात होती. या चर्चेचा जोर इतका होता की, अनेकांनी तर सईताई आता लवकरच भाजपवासी होतील असेही सांगून टाकले. तथापि श्रीमती डहाके यांच्या समर्थकांनी या चर्चेचा सूर फेटाळला. यापूर्वीच्या चर्चेत श्रीमती डहाके यांचे नाव शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीशी देखील जोडले गेले होते.
वास्तव हे की, श्रीमती सईताई डहाके ह्या सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळविणे कठीण असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी म्हणे मग शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचे मार्फत उमेदवारीसाठी प्रयत्न केले पण हे प्रयत्न पुढे फळाला येणार नाहीत हे वेळीच लक्षात आल्याने श्रीमती डहाके यांनी आता सावध पवित्रा घेतला आहे म्हणूनच रविवारच्या मेळाव्याला महत्त्व आले आहे. माहिती अशी आहे की, श्रीमती सईताई डहाके ह्या या मेळाव्याला प्रामुख्याने उपस्थित राहून विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी बाबत कार्यकर्त्यांशी चर्चा आणि विचारविमर्श करून निर्णय घेतील रविवारच्या मेळाव्यातून त्या नक्की कोणती भूमिका जाहीर करतात याकडे विविध राजकीय पक्षाचे लक्ष लागून आहे.