मुलचेरा तालुक्यातील रेंगेवाई ते कोपरल्ली मार्गावर जंगलातून अचानक रस्त्यावर आलेल्या नीलगायीची दुचाकीला धडक बसल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली.
मुलचेरा तालुक्यातील रेंगेवाई ते कोपरल्ली मार्गावर जंगलातून अचानक रस्त्यावर आलेल्या नीलगायीची दुचाकीला धडक बसल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. राकेश डे (वय 33 रा. चामोर्शी) असे यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चामोशी येथील रहिवासी राकेश डे हे सुंदरनगर येथे माहेरी असलेल्या पत्नी व मुलीला आणण्यासाठी बुधवारी दुपारच्या सुमारास आष्टी-मुलचेरा मार्गे सुंदरनगरला जाण्यासाठी निघाले होते. रेंगेवाई ते कोपरली दरम्यान त्यांच्या दुचाकीला अचानक नीलगायीने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे दाखल करण्यात आले. परंतु, तेथे इलाज होऊ न शकल्याने चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. वाटेत त्यांची हालचाल बंद झाल्यामुळे त्यांना पुन्हा चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखवले असता, तपासात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आर्थिक भरपाई देण्याची मागणी
हा अपघात वन्यप्राण्याने धडक दिल्यामुळे झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून शासनाने आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी मृत तरुणाची पत्नी सुप्रिया राकेश डे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी मार्कंडा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे