चंद्रपूर, दि. 4 मे : चंद्रपूर शहराला 9 कि.मी. समांतर वाहणा-या इरई नदीच्या खोलीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. या मोहिमेत शासनाच्या विविध विभागांचा सहभाग असून सामाजिक संघटना, लोकसहभाग आदींच्या माध्यमातून सदर मोहीम 45 दिवस निरंतर सुरू राहणार आहे. विविध यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून सद्यस्थितीत नदीच्या खोलीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.
चंद्रपूर शहर ते इरई – वर्धा नदी संगमापर्यंतच्या 17 कि.मी. लांबीत इरई नदी पात्रातील वाढलेली झाडेझुडपे, गाळ काढून नदी पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नदी पात्राची पूर वहन क्षमता वाढण्यास मदत होईल व शहराला दरवर्षी पडणारा पुराचा वेढा कमी होईल, या उद्देशाने 25 एप्रिल 2025 रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते इरई नदी खोलीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. तीन टप्प्यात खोलीकरण करण्यात येणार असून पहिला टप्पा रामसेतू ते चौराळा पुल, दुसरा टप्पा माना टेकडी (लालपेठ कॉलरी) आणि तिसरा टप्पा इरई ते वर्धा नदी संगमापर्यंतचा आहे.
पहिल्या टप्प्यात राम सेतू ते चौराळा पुल दरम्यान अम्युझमेंट पार्कजवळ काम सुरू असून आतापर्यंत नदीपात्रातील 200 मीटर जागेतील 14 टीसीएम (अंदाजे 5600 ब्रास ) गाळ काढण्यात आला आहे. यासाठी 8 पोकलॅन मशीन, 15 हायवा / टिप्पर, 9 टॅक्टर, 2 जे.सी.बी. सद्यस्थितीत असले तरी ही यंत्रसामुग्री वाढविण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे.
सदर मोहिमेत जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, वन विभाग, चंद्रपूर महानगरपालिका, कृषी विभाग, पाटबंधारे विभाग, भूमि अभिलेख कार्यालय, जिल्हा खनिकर्म, प्रादेशिक परिवहन विभाग, पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र प्रदुषण महामंडळ ही सर्व शासकीय कार्यालये, सीटीपीएस व डब्ल्युसीएल या खाजगी आस्थापना तर भारतीय जैन संघटना, नाम फाऊंडेशन व टाटा ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आहे. मोहिमेदरम्यान निघणारा सुपीक गाळ शेतक-यांना निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र त्यासाठी वाहनाची व्यवस्था शेतक-यांनी स्वत: करायची आहे.