वाशिम - आकांक्षीत जिल्ह्यात विकासाची गंगा वाहती ठेवण्यासाठी झटणार्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस,जिल्हयातील आरोग्य सेवेला राज्यात क्रमांक एकचा दर्जा देणारे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे व समाजसेवेत आपले संपूर्ण जीवन खर्ची घालणारे समाजसेवक निलेश सोमाणी यांचा लघु वृत्तपत्रांच्या वतीने शुक्रवार, ४ जुलै रोजी त्यांच्या कार्यालयात भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांच्या नेतृत्वात ४० दिवसात ४० हजार जलतारा निर्मिती करून जिल्ह्याने भूजल पुनर्भरणाच्या क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी केली आहे. या कामगिरीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद करण्यात आली आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांचा तसेच तळागाळातील लोकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळवून देण्यासह आरोग्य सेवेला राज्यात सन्मानाचे नवे आयाम देणारे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांच्यासह गोरगरीबांच्या मदतीसाठी सदैव धावून जाणारे व मुक्या प्राण्यांच्या सेवेसाठी तत्पर असणारे चैतन्याचे उर्जास्त्रोत, गोरक्षक, संवेदनशिल पत्रकार व विविध शासकीय पुरस्काराने सन्मानित झालेले सामाजीक कार्यकर्ते निलेश सोमाणी यांचा लघुवृत्तपत्र पिंगलाक्षी एक्सप्रेस व पहाटवारा परिवाराच्या वतीने पत्रकार गजानन बानोरे व संदीप पिंपळकर यांच्या हस्ते रिसोडचे ग्रामदैवत पिंगलाक्षी देवी यांची प्रतिमा, शाल व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. असे वृत्त पत्रकार गजानन बानोरे यांचेकडून महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेला मिळाल्याचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.