छत्रपती संभाजीनगरमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. वैजापूर तालुक्यातील शिवाराईमध्ये ही घटना घडली. शेतामध्ये काम करत असताना अचानक मुसळधार पाऊस आला. पावसापासून बचाव करण्यासाठी चौघेही प्लास्टिक डोक्यावर घेऊन बसले. तेवढ्यात वीज कोसळली. या घटनेत एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाले. तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मराठवाड्यात १४ दिवसांत वीज पडून २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील शिवराई शिवारात वीज पडून एकाचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. भागवत काशिनाथ डीके (वय ३२ वर्षे) या व्यक्तीचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. तर सचिन आसाराम सोनवणे, वनिता सागर सोनवणे आणि निता सचिन सोनवणे हे तिघे जण अंगावर वीज पडल्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेबाबत स्थानिकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोनवणे कुटुंबीय हे शिवराई शिवारात गट क्रमांक २२ मध्ये पेरणी करत होते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाला. पावसापासून संरक्षण करण्यासाठी चौघेही प्लास्टिकची ताडपत्री डोक्यावर घेऊन मोकळ्या जागेत बसले. त्याचवेळी अचानक त्यांच्यावर वीज कोसळली. या घटनेत चौघे गंभीर जखमी झाले.
जखमी झालेल्या चौघांना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र भागवत डीके यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर तिघांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना वैजापूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली उपचार सुरू आहेत. तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.