अकोला: राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन अकोला शाखा व त्यांच्याशी संलग्न इतर वैद्यकीय संघटनांतर्फे दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. परंतु यावर्षीचा डॉक्टर्स दिन अभूतपूर्व आणि अविस्मरणीय असा असणार आहे. यावर्षी इंडियन मेडिकल असोसिएशन अकोला शाखा व इंडियन सोसायटी फॉर क्रिटिकल केअर मेडिसिन यांच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या राष्ट्रपतींनी पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत तज्ञ डॉक्टरांचा नागरी सत्कार व त्यांचे आरोग्यासंबंधी अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
"हमें जीन पर नाज है" या शीर्षकाखाली रविवार दिनांक 30 जून रोजी सकाळी ९:३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन प्रमिलाताई ओक हॉलमध्ये करण्यात आले आहे.
पद्मश्री पुरस्काराने ज्यांना गौरविले आहे आणि संपूर्ण देशातच नव्हे तर जगभरात ज्यांची विंचू दंशावरील उपचाराच्या संशोधनासाठी ख्याती आहे असे कोकणातील महाड येथून विशेषकरून आलेले डॉ हिम्मतराव बावस्कर, नेत्रहीनांसाठी फार मोठी चळवळ उभारून नेत्रदानासाठी भरघोस कार्य केल्याने पद्मश्री प्राप्त नागपूरचे माजी खासदार डॉ विकास महात्मे आणि विदर्भातीलच नव्हे तर संपूर्ण मध्य भारतातील मेंदू रोगांसाठी देवदूत ठरलेले नागपूरचेच डॉ चंद्रशेखर मेश्राम या तीन धन्वंतरीची उपस्थिती एकाच वेळी अकोला लाभणार आहे. अकोल्यात पहिल्यांदाच असा भव्य स्वरूपाचा कार्यक्रम होऊ घातला आहे.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टरांचे विविध विषयांवर सर्वसामान्यांना मार्गदर्शन लाभणार आहे. "खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या किडनीच्या आजारांच्या समस्यांचे निराकरण सहज शक्य" या अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आरोग्याला भेडसावणाऱ्या विषयावर डॉ हिम्मतराव भास्कर मार्गदर्शन करतील तर "आरोग्याच्या अदृश्य समस्या" याबद्दल डॉ विकास महात्मे मार्गदर्शन करतील त्याचप्रमाणे डॉ चंद्रशेखर मेश्राम "आहार आणि मेंदूचे आरोग्य" यासंबंधी उपस्थितांना अवगत करतील.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक इंडियन मेडिकल असोसिएशन आणि आयएससीसीएम चे अध्यक्ष डॉ राजेंद्र कुमार सोनोने, सचिव डॉ सागर भुईभार, डॉ नितीन उपाध्ये, डॉ किशोर पाचकोर, डॉ सुमेधा हर्षे, डॉ नम्रता भागवत, डॉ निखिल किबे आणि त्यांची चमू अथक परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.