भारतीय संस्कृती मधील, सर्वात मोठ्या सणांचा राजा दिपावलीचे महत्व आता संपूर्ण विश्वालाही पटायला लागलेले असून, जवळ जवळ सर्वच जनजाती आणि सर्व धर्मीय बांधवही शासनमान्य दिपावली सण साजरा करीत असल्याने या सणाच्या निमित्ताने जागतिक एकात्मता आणि विश्व शांती सुद्धा साध्य होत आहे. मुळच्या हिंदु संस्कृतीतील दिपावलीला ऐतिहासिक-पारंपारिक -सांस्कृतिक-धार्मिक-आध्यात्मिक महत्व सुद्धा आहे. शहरी-ग्रामिण,गरीब-श्रीमंत,आबाल-वृध्दांसह, स्त्री-पुरुष हा सण अतिशय आनंदोत्सवात साजरा करीत असतात. दिवाळी सणाला धनत्रयोदशी (आयुर्वेद व शारिरिक महत्व) नरक चतुर्दशी( सज्जनांचे संरक्षण व दृष्टजनांचा, दृष्टप्रवृत्ती, विषय वासनेचा संहार), लक्ष्मीपूजन (गणेश, सरस्वती लक्ष्मी, अन्नपूर्णा पूजन), बलिप्रतिपदा (शेतकरी राजाचे पूजन), भाऊबिज (बहिण,भाऊ , जावाई, नातेवाईक इ कौटूंबिक नात्यांच्या बळकटीचा दिवस.) इ. दिवस या सणात अग्रक्रमाने साजरे केल्या जातात . त्यामुळेच या सणाचा आनंद द्विगुणीत करण्याकरीता, प्रत्येक व्यक्ती ह्या आपआपल्या घरादाराला दुकान प्रतिष्ठानाला रंगरंगोटी, वास्तुप्रवेश करतात. लहान मुलांपासून वयोवृद्धांना नविन कपडे घेतात. प्रत्येकांच्या घरी गोडाधोडाचे मिष्ठान्न आणि फराळाचे पदार्थ केल्या जातात. दिपोत्सव साजरा करण्याकरीता घरोघरी रांगोळ्या, हारफुले तोरणाची सजावट आणि तेलाच्या पणत्यांचे चिरांगण आणि आकाश कंदील तसेच आनंदोत्सव साजरा करण्या करीता फटाक्यांची आतिशबाजी केली जाते. दिपावलीला परदेशातील चाकरमान्यांपासून तर सासर वाशिनी माहेरी येत असतांत. नातेवाईक, गावातील गावकरी आणि दुरावलेल्या मित्रमंडळीच्या दिवाळी सणाच्या निमित्ताने भेटीगाठी होत असतात . त्यामुळे दिवाळी सणाला एकोपा व सलोखा साधल्या जात असतो. दिवाळी सणाला नविन व्यापारी वर्ष सुरु होत असते. ह्या सणाला वार्षिक हिशेब सुद्धा होत असतात. त्यामुळे प्रत्यक्ष शासन सुद्धा दिपावली सणाला विशेष महत्व देऊन आपल्या नागरिकांसाठी विविध सोई सवलती योजना जाहिर करीत असते . एकंदरीत दिवाळी सण हा नात्यानात्यांमध्ये विश्वास व बळकटी आणून, राष्ट्रिय एकात्मता, जातिय सलोखा साध्य करण्याच्या दृष्टिने महत्वाची भूमिका पार पाडीत असतो. त्यामुळे आपल्या भारतिय संस्कृती मध्ये दिवाळी सणाला अग्रस्थान आहे. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाज प्रबोधनकार संजय कडोळे यांनी केले आहे .