वाशीम - प्रत्येकाच्या अंगी एखादा नैसर्गीक कलागुण असतो. अनेकजण या गुणांना आपल्या रोजच्या जीवनात जपुन त्याला नवा आकार देण्याचा प्रयत्न करतात. शहरातील टिळक चौकातील रहिवासी व जिल्हा व सत्र न्यायालयात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या हर्षल हिवसे या युवकाने आपल्या या कलेला जोपासून नवरात्रीच्या पवित्र महिन्यात खडुमध्ये वाशिमची कुलस्वामिनी माता चामुंडादेवीचे मनमोहक शिल्प साकारले आहे. कलावंत हर्षलने खडुमध्ये साकारलेल्या या शिल्पाचे विविध स्तरातुन कौतुक होत आहे.
आपल्या एखाद्या छंदातुन पर्यावरणाला हातभार लागु शकतो ही बाब अनेक कलावंतांनी आपल्या अप्रतीम कलेच्या माध्यमातून सिध्द झाली आहे. शहरातील गणेशपेठ भागात राहणार्या हर्षल हिवसे या हरहुन्नरी युवा कलावंताने लहानपणापासून जोपासलेल्या आपल्या कलेच्या माध्यमातून याआधीही खडूमध्ये भगवान गौतम बुध्द, भगवान महाविर, अष्टविनायक, विठ्ठल रुखमाईचे शिल्प रेखाटले होते. नवरात्रीमध्ये हर्षलने खडूला चामुंडादेवीचा आकार देवून अप्रतिम चित्र खडूमध्ये साकार केले आहे. हर्षलने आधीही मागील वर्षी खडुमध्ये अष्टविनायकाचे अप्रतीम शिल्प रेखाटले होते. खडूमध्ये रेखाटल्यानंतर रंगाच्या जादुगारीने हे शिल्प जिवंत वाटते. याबाबत बोलतांना हर्षल म्हणाला की, नेहमी रोजच्या आपल्या घाईगडबडीच्या जीवनातुन आपल्याला आवडणारी कला टिकवून ठेवणे व त्यासाठी वेळ देणे फार कठीण असते. पण जिद्द व आवड असली तर हे सर्व सोपे जाते. खडुमध्ये विविध देव आणि महापुरुषाचे चित्र रेखाटणे ही कल्पना माझ्या डोक्यात आली आणि मी त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले. व मनापासून केलेल्या या प्रयत्नाला यश मिळाले. विशेष म्हणजे हर्षलने या कठीण चित्रकारीसाठी कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. आपल्या कलेच्या माध्यमातून हर्षलने इतरांना पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला आहे. दिवसेंदिवस या कलेमध्ये पारंगत होवून उंच शिखर गाठून यापुढे नवनवीन शिल्प खडुमध्ये साकार करण्याचा मानस हर्षलने व्यक्त केला आहे. समाजात असे अनेक युवा कलावंत आपल्या कलेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात. शासन व सरकारने त्यांच्या कलेची दखल घेवून या कलेचे संवर्धन व राजाश्रय देण्याची गरज असल्याचे मत हर्षलने व्यक्त केले आहे.