अकोला :-
अतिशय घराजवळील दवाखान्यात स्टेथोस्कोप गळ्यात लटकावून कडक इस्त्रीच्या पांढऱ्या शुभ्र वेषात मिरवण्याची, मागे पुढे नर्सेस वार्ड बॉईस येस मॅडम, येस मॅडम करत तुमचा प्रत्येक शब्द झेलायला तयार असताना ही सुवर्णसंधी आणि ही ऐश्वर्यसंपन्न जीवन प्रणाली सोडून घरापासून 58 किमी अंतरावर, स्वखर्चाने पदरमोड करून, पुण्यातील ट्राफिक ओलांडून, मावळातील उन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता, शेण गोमूत्राच्या वासात शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसून
निरापेक्षपणे गोसेवा आणि मोफत रुग्णसेवा करणाऱ्या, स्वतः मानसशास्त्रातील उच्च पदवीधर असलेल्या अक्षरशः वेड्या तरुणीची ही गोष्ट हो ठार वेडीच म्हणावे लागेल तिला. कारण आज महाराष्ट्रातील प्रत्येक विवाहच्छुक तरुणीचे स्वप्न पुण्यातील घर, आय टी तील नोकरीं हे असताना पिंपळे सौदागर येथील पार्क रॉयल या खरोखरच आणि शब्दश: राजेशाही विस्तीर्ण फ्लॅट मधील वास्तव्य, कोथरूड सारख्या भागातील स्वतःची वैद्यकीय प्रॅक्टिस, वातानुकुलीत केबिन मध्ये बसल्या बसल्या दरमहा मिळणारे पाच आकडी उत्पन्न सोडून नाणे मावळ सारख्या ग्रामीण भागात जाऊन तिथे खिल्लार या महाराष्ट्रीयन गायीच्या प्रजातीवर नुसते संगोपनच नव्हे तर संवर्धन आणि संशोधन कार्य करणे,
निसर्गपचार, पंचगव्य, आयुर्वेद यांचा अतिशय कल्पकतेने वापर करून आणि योग्य मिलाफ घडवून आजूबाजूच्या ग्रामीण स्त्री पुरुष रुग्णांना संपूर्णतः मोफत भारतीय वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या पंचगंव्य एम. डी. डॉ. सौ. अनुपमा गिरीश उंब्रजकर यांची ही कहाणी.
आज बऱ्याच दिवसानंतर नव्हे तर बऱ्याच वर्षानंतर श्री समर्थ श्रीधर गोशाळेत जाण्याचा योग आला.
डॉ. अनुपमा यांनी पुण्यातील उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या कोथरूड भागातील स्वतःची वैद्यकीय क्षेत्रातील प्रॅक्टिस सोडून स्वतःला गोसेवेला वाहून घेतल्याचे ऐकीवात होते. मी बऱ्याच वेळेस त्यांच्या या योगदानबद्दल माझ्या लिखाणात आणि वक्तृत्वात सुद्धा या गोष्टीचा उल्लेख सुद्धा केलेला होता.
काही वर्षांपूर्वी, कोविड च्या पूर्वी त्यांनी जेव्हा हा प्रकल्प हाती घेतला होता जेव्हा मी एकदा तिथे भेट सुद्धा दिली होती. परंतु त्या वेळेस हा प्रकल्प अतिशय लहान प्रमाणात होता.
तेव्हा मी ही कल्पना सुद्धा केली नव्हती की एखादी वैद्यकीय क्षेत्रातील युवती या गोसेवेसारख्या क्षेत्रात एवढे दिवस तग धरून उभी राहिल.
पाच वर्षांपूर्वी 2 गाई आणि एक वासरू अशा तीन गोधनापासून सुरु झालेला हा प्रकल्प आज 19 गाईपर्यंत आणि सुमारे पाच विस्तीर्ण एकरात हात पाय पसरून उभा आहे.
"गोसेवा व रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा" या उक्तीस अनुसरून अनुपमाजी या प्रकल्पसाठीच नव्हे तर आजूबाजूच्या पंचक्रोशीत सुद्धा प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाल्या आहेत.
भारतीय हिंदू संस्कृतीत गाईत आणि आईत फारसा फरक नाही. एखादी गाय आजारी असताना तिचे डोके मांडीवर घेउन चार चार दिवस अहोरात्र मांडीवर घेउन बसलेल्या या अनुपमेला मी स्वतः पहिले आहे.
माझ्या गाई माझ्या आई तर आहेतच पण प्रसंगी त्या माझ्या लेकी सुद्धा आहेत ही जाणीव या माऊलीच्या बोलण्यातून अनेकदा जाणवते.
त्या गोधनाला योग्य पोषण मिळायला हवे त्यांना नैसर्गिक वातावरण मिळायला हवे यासाठी त्या कायम प्रयत्नशील असतात.
त्यांनी बनवलेला प्लास्टिक व सिमेंट काँकरीट न वापरता बनवलेला गोठा, स्वयंपाक गृह, कार्यालय, गाई आणि वासरांच्या मुक्त संचारासाठी तयार केलेला स्वतंत्र विभाग. स्वतः उत्पादीत केलेला रसायनखत मुक्त असलेला चारा, हिरवे गवत हे सगळे घटक त्यांच्या कल्पक्तेची उदाहरणे आहेत. हे प्रयोग बघायला, अनुभवायला आपण तिथे एक भेट द्यायलाच हवी.
गाईंना ताप आल्यास त्यांच्या जिभेवर लोणचे घासावे लागते, ते सुद्धा बाजारातले नको म्हणून आंब्याची झाडे सुद्धा त्यांनी आवारात लागवड केलेली दिसली.
भविष्यात गाईंसाठी मूरघास नावाचे खाद्य स्वतः तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी लागणारे मका, तांदूळ, ज्वारी व ऊस यांच्या उत्पादना बद्दलचे प्रयोग आणि त्याचे वर्णन करताना आज त्यांचा उत्साह आज खरोखरीच वखाणण्याजोगा होता.
विशेष म्हणजे आज प्रत्येक व्यक्ती शासनाकडून, इतरांकडून अनेक गोष्टींची अपेक्षा करत असतांना डॉ अनुपमा मात्र कुठलीही शासकीय अथवा वैयक्तिक मदत न घेता धैर्याने हे सर्व आघाड्या स्वतःच्या हिमतीवर चालवत आहेत. वाढवत आहेत.
एखाद्या यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा भक्कम पाठिंबा असतो ही म्हण आपणास ज्ञात आहे,
परंतु एका ध्येयवेड्या स्त्रीच्या मागे तिच्या माहेरचे चौधरी कुटुंब, पितृतुल्य सासरे श्री भाऊकाका उंब्रजकर, नावाप्रमाणे एखाद्या पर्वतासमान पाठीशी उभे असलेले त्यांचे यजमान श्री गिरीश, गार्गी आणि आर्या या
दोन्हीही कन्या यांचाही भक्कम पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही.
त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नास आपण सर्वांनी नुसत्याच कोरड्या शुभेच्छा व सहानुभूती न दाखवता काहीतरी भरीव मदत करावी या अपेक्षेने मी आज ही पोस्ट करीत आहे.
मी आपणा सर्वांना विंनती करतो आपण सर्व मिळून काही ना काही, फुल ना फुलांची पाकळी ही गोसेवेकरीता मदत म्हणून आणि त्यांच्या या कार्यास हातभार लावूया. आणि थोडेसे पुण्य आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करू या. ही आपणा सर्वांना नम्र विनंती.
आपणापैकी ज्यांना शक्य असेल त्यांनी किमान गोशाळेला एखादी सहकुटुंब व्हिसिट करून, गाईंच्या व निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालावावा, एक वेगळा अनुभव घ्यावा, त्यांच्या या कर्तृत्वास प्रोत्साहन देऊ या आणि त्यांच्या या कार्यासाठी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊ या. हे आपणा सर्वांना मनःपूर्वक आवाहन.
डॉ. सौ अनुपमा उंब्रजकर
आपल्या प्रतिक्रिया द्या....