नवी दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावर वरोरा शहरानजीक रेल्वे गाडीखाली आल्याने वेगवेगळ्या ठिकाणी दोघांचा मृत्यू झाला. त्यात कर्तव्य बजावत असलेल्या रेल्वे कर्मचार्याचाही समावेश आहे. तर दुसर्याची ओळख पटली नाही. ही घटना गुरूवार, 5 मे रोजी घडली.
वरोरा रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रॅक ओलांडताना रेल्वेने धडक दिली व त्यास चाळीस फुटापर्यंत फरपटत नेले. यात सागर झाडे यांचा जागीच मृत्यू झाला. सागर झाडे हे 6 वर्षांपूर्वी रेल्वेमध्ये लागले होते. 1 वर्षापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. वरोरा रेल्वे स्थानकाच्या कार्यालयात ते कार्यरत होते. काही कामानिमित्त रेल्वे ट्रॅक ओलांडून जात असताना रेल्वेने धडक दिली, यात त्यांचा मृत्यू झाला.
दुसर्या घटनेत वरोरा शहराच्या बोर्डा चौकानजीक रेल्वेने धडक दिल्याने एका इसमाचा मृत्यू झाला. इसमाची ओळख पटविण्याचे काम वर्धा पोलिस करीत आहे. तर रेल्वे कर्मचार्याच्या मृत्यूची चौकशी बल्लारपूर लोहमार्ग पोलिस करीत आहे.