वाशिम : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता दिनांक 18 जुलै रोजी झाली. या अधिवेशनात शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्या मार्गी लागलेल्या आहेत. तसेच बऱ्याच समस्यांबद्दल भरीव पाठपुरावा करण्यात आलेला आहे.
अमरावती विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार ॲड किरणरावजी सरनाईक यांनी विविध मार्गाचा अवलंब करीत शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्यांना वाचा फोडली आहे.
विनाअनुदानित अंशतः अनुदानित जवळपास साठ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान टप्पा मिळाला असून,दिनांक एक ऑगस्ट पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. याबाबतीत किरणरावजी सरनाईक यांनी लक्षवेधी प्रश्न, पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन, तसेच पुरवणी मागण्या द्वारे पाठपुरावा केला होता.
याशिवाय आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 'काम नाही वेतन नाही' शासन निर्णय रद्द करणे,कर्मचाऱ्यांचे पगार एक तारखेला होणे, अंशतः अनुदानित लेखाशीर्ष यांना नियमित व पुरेसा निधी देणे, दिनांक 15 मार्च 2024 चा संच मान्यते संदर्भातील शासन निर्णय रद्द करणे, वरिष्ठ व निवड श्रेणी चे प्रशिक्षण आयोजित करणे, ग्रंथपाल पदाकरिता पटसंख्या शिथिल करणे, एक नोव्हेंबर 2005 पूर्वी च्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे, थकीत देयके अदा करणे इत्यादी अनेक प्रश्न मांडण्यात आले.
यापैकी शिक्षक समन्वय संघाच्या लढ्यामुळे व ॲड किरणरावजी सरनाईक यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अनुदान टप्पा जाहीर करण्यात आलेला आहे. काम नाही वेतन नाही या शासन निर्णयासंदर्भात मा.अशोक उईके साहेब यांनी बैठक बोलवण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागण्याची आशा असल्याचे त्यांच्या वाशिम कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळविले आहे.