मनुष्य जन्माला का येतो? मूळ कारण कोणते? मनुष्य जन्माला येतो ते त्याच्या प्रारब्धामुळे. त्याच्या संचितामुळे आणि त्याद्वारे त्याने आचरलेल्या कर्माचे भोग भोगण्यासाठी. संत तुकाराम म्हणतात की, जन्मा येणे पातकाचे मूळ । संचिताचे फळ आपुलिया ।।" जन्माला येणे हेच मनुष्याने केलेल्या पापाचे किंवा पातकाचे मूळ असून जन्माला येणे आपल्या संचिताचे फळ असते. राष्ट्रसंत म्हणतात की, "सुखकर हरीगुण गाई मनुजा । नरदेहाची सुंदर वेळा साधुनी घे लवलाही ।" मनुष्य जन्माला येतो कारण त्याला या जगात चांगले जीवन जगायचे आहे. मनुष्य जन्माचं सार्थक झालं पाहिजे ना. गौतम बुद्ध, शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वरादी भावंडे, रामकृष्ण परमहंस, रामदास स्वामी यांनी त्यांच्या जीवनाचा उद्देश जगाला दाखवून दिला. जीवन असं जगावं जेणेकरुन आपली कीर्ती मागे उरेल.
सुधर रे गड्या ! जन्म अता अपुला ।
काळ टपुनिया जवळ बसला ।।धृ।।
जन्म घेतल्या बरोबरच काळ सुद्धा आपल्या सोबतच राहत असतो. व्यक्तीच्या जवळच मृत्यू टपून बसला आहे. त्याला येण्यास मुळीच वेळ लागत नाही. म्हणून तुझा जन्म वाया घालू नकोस. हा मनुष्य जन्म मिळणे दुर्लभ आहे तो नेहमी मिळत नाही. त्यासाठी चांगलं कर्म करा. मनुष्य जन्म मिळून तू वासनेच्या आहारी गेला आहेस. तुला स्वतःला सुधारण्याची गरज आहे आणि मनुष्य जन्माचे सार्थक कर.
क्षणिक हे सुख, का बघुनी भ्रमशी? शेवटी देईल यम फाशी ।
शोध अंतरी, का जन्मा येशी? येऊनी सूकरवत होशी ।।
काय कारणे, तुज खटपट ऐसी? व्यर्थची फिरशी चौऱ्यांशी ।
सोड ही बला, धरी गुरु चरणाला ।।१।।
मनुष्य जन्म अनमोल आहे आणि तो एक दिवस मातीतच जाईल. सुख हे क्षणिक आहे. जीवनातील सुख क्षणिक आनंद नसून ते मनशांती, समाधानाची दीर्घकालीन अनुभूती आहे. या क्षणिक सुखात भ्रमू नकोस. संत तुकारामांनी देवा तुझा विसर न व्हावा असे म्हटले आहे. भ्रमात मनुष्य धोका खात असतो. सुख अनुभवतांना कधी यमराजा आपले प्राण घेऊन जाईल याचा नेम नाही. स्वर्ग, नरक ही केवळ कल्पना आहे. मनुष्य मेल्यावर स्वर्गात किंवा नरकात जाईल याचा विचार करु नकोस. जन्माचे सार्थक कसे होईल याचा विचार कर. राष्ट्रसंत म्हणतात की, "कीर्ती हाची स्वर्ग खरा, अपकीर्ती नरकाचा पसारा ।" आपण जन्माला का येतो ते तू अंतरी शोध म्हणजे मनामध्ये शोधून बघ. जन्माला येणारा मनुष्य एक दिवस मरणारच. सूकर होणे म्हणजे जन्माचे सार्थक होणे, सुखमय होणे आणि वत म्हणजे अनुभवणे. जीवन सार्थक होत असताना अनुभव येतो. तू नेहमी कोणती ना कोणती खटपट करीत असतो. मनुष्य जन्म घेण्याआधी तू व्यर्थ ८४ लाख योनीतून प्रवास करीत होता. आत्मा विविध प्राण्यांच्या योनीतून जन्म घेतो आणि चांगल्या कर्माचे आधारे मनुष्य जन्म प्राप्त होतो.
८४ लाख योनीचे नियोजन परमेश्वराने केले आहे. ३० लाख झाडे झुडपे, २७ लाख योनी किटक, १४ लाख योनी पक्षी, ४ लाख प्राण्यांच्या, ९ लाख योनी जलचर. या सर्व योनी भटकल्यानंतर चांगले कर्म असेल तर मनुष्य जन्माची प्राप्ती होते. सतत ८४ लाख योनी विनाकारण फिरतोस. ही बला सोडून दे आणि वाईट वागणे, पाप करणे सोडून दे. ही बला सोढण्यासाठी गुरुदेवाचे चरण धर. त्यांना नमस्कार कर. गुरुदेव आपल्याला ज्ञान, प्रेम सद्गुणांनी भरतात. ते योग्य मार्ग दाखवितात. "सद्गुरु वाचोनी सापडेना सोय । धरावे ते पाय आधी आधी ।" गुरुदेवाचे पाय धरल्यामुळे गुरु आपणांस अधिकार संपन्न बनवितात.
मित्र गणगोत, मात-पिता-दारा, स्वप्नसम जाणी नसे थारा ।
या योनीत भ्रमला जग सारा, पुढे का नरदेही वारा ।।
त्वरीत लागतो? चौऱ्यांशी फेरा, फिरुनिया आला कुविचारा ।
तरी ना तुज मार्ग कसा दिसला? ।।२।।
मनुष्य जन्मात आपल्याला मित्र, सगेसोयरे, आई वडील, पुत्र मिळतात पण हे स्वप्नसम जाणावे कारण अंतकाळी कुणी नाही रे कोणाचे? सगेसोयरे निघून जातील त्याच मार्माने आपणही जाऊ. जन्म घेतल्याबरोबर तू या स्वप्नवत जगात रमलास. पुढे नरदेहाचा वारा सुद्धा लागणार नाही. नरदेह स्वहित साधण्यास खर्ची घालावा कारण मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळणार नाही. संत तुकाराम म्हणतात की, मनुष्याने स्वतःचे हिताचा विचार करावा कारण हा देह तुमच्या हातून निसटला की, काही केल्या तो परत मिळणार नाही. या मनुष्य जन्माचा ठेवा लागला आहे तर हरीला हृदयात स्थान द्या, त्याला चित्तात साठवा, नामजप करा तरच जन्म मरणातून सुटका होईल. चौऱ्यांशी योनीचा फेरा चुकतो. कुविचार म्हणजे वाईट विचार करणे हे वाईट विचार नुकसानकारक, हानीकारक असू शकतात. तू सुविचाराचा योग्य मार्ग निवड. मनाला चुकीच्या मार्गाने जाऊ देऊ नकोस.
हीच नरतनू मिटवाया जन्म, म्हणूनी स्मर श्रीगुरुचे नाम ।
कनक-कांतेशी ना ठेवी प्रेम, हृदयी धर तो श्री रघुराम ।।
चुकवी जन्मास तोडुनिया मरण, करील भवसागरी तो तरण ।
द्वैत-बुद्धीचा वास, ठेवी दुरला ।।३।।
जीवंतपणी माणसाच्या सर्व इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत. त्यामुळे त्यास नवनवीन जन्म घ्यावे लागतात व जन्म मृत्यूच्या चक्रात अडकावे लागते. पुन्हा पुन्हा जन्माला येण्याचे चुकवायचे असेल तर श्री गुरुदेवाचे नामाचे स्मरण कर किंवा जप कर. कनक-कांता म्हणजे सोने-सुंदर. कनक म्हणजे सोने आणि कांता म्हणजे सुंदर, प्रीय पत्नी असा होतो. सोन्यासारख्या सुंदर स्त्रीवर प्रेम करु नकोस. द्रव्य आणि स्त्री ही अनेकदा कलहास कारण होते व त्यापासून आपत्ती येण्याचा संभव असतो. त्यापेक्षा हृदयात श्री रामाला बसवणे म्हणजेच आपल्या मनात रामभक्ती जागवणे होय. राम हे केवळ एक देव नाहीत तर ते एक आदर्श आणि जीवनशैली आहेत. त्यांचे आचरणाचे पालन केल्यास जीवन सुखद, सार्थक होते. श्री रामाचे आदर्श जीवन, सत्य, न्याय, प्रेम आपल्या अंगी बाणावे. "जन्ममरण नको आता नको येरझार" जन्म मरण ह्या दोन्ही घटना म्हणजे मानवी जीवनाची दोन टोक. जन्मा येणे नसेल तर भवसागर पार कर. सर्व बंधनातून मुक्त होणे म्हणजे मोक्ष प्राप्ती मिळवणे होय. हा भवसागर पार करताना आपले षडरिपु जोर करतात. ईश्वर नामच आपल्याला भवसागर तारुन नेऊ शकते. आपल्या द्वैत बुध्दीला दूर ठेवा. द्वैत म्हणजे भिन्नता आणि अद्वैत म्हणजे एकरुपता होय. द्वैत बुद्धी म्हणजे दोन भिन्न गोष्टी किंवा विचारातील फरक ओळखण्याची, त्यांना वेगळे मानण्याची क्षमता. संत ज्ञानेश्वर हरिपाठात म्हणतात, "एक नाम हरी द्वैत नाम दूरी । अद्वैत कुसरी विरळा जाणे ।" एकच हरीच नाव द्वैत भावना दूर करते म्हणून एकाच नामाचा जप करावा, नामस्मरण करा. परमेश्वर वेगवेगळा भासत असला तरी तो एकच आहे.
घेई गुरुकृपा, कलियुगीचे सार, काढी हा मैलाचा भार ।
धीर धरवेना, ना ये सुविचार, करी तुकड्याला जगपार ।।
स्वामी माझीया, घे चरणी मजला ।।४।।
गुरुकृपा घेई म्हणजे गुरुकडून कृपा मिळविणे किंवा त्यांचे मार्गदर्शन स्विकारणे. गुरुदेवांनी दिलेले ज्ञान मार्गदर्शक ठरते. "गुरुकृपा झाली इमारत फळा आली" गुरुकृपेनेच सर्व गोष्टी साध्य होतात. कलियुग म्हणजे हिंदू धर्मातील युगांच्या चक्रातील चौथा आणि शेवटचा युग. या युगात अज्ञान, दुराचार आणि पापांचे प्रमाण वाढते. कलियुग हे अंधकार युग, दुःख, झगडा, पाखंड युग आहे असेही म्हणतात. कलियुगाचे सार म्हणजे नामस्मरण हाच एकमेव उपाय. राष्ट्रसंत म्हणतात की, "तुझे ध्यान हे अंती येईल कामी । म्हणोनी प्रभु शरण आलो तुला मी ।।" नामस्मरण आपल्याला परमेश्वराशी जोडतो आणि पापांपासून दूर ठेवतो. परंतु तुझे मन वासनेने, वाईट विचाराने भरलेले आहे, तो मैलाचा भार तू दूर कर. काय करावे आणि काय करु नये. माझे लक्ष एका जागी स्थिर होत नाही. राष्ट्रसंत म्हणतात, मला जगपार कर. जगपार म्हणजे विश्वाच्या पलीकडे कर. म्हणजेच हा कठीण असा भवसागर पार कर. स्वामी, परमेश्वरा मला हेच दान दे की, तुझ्या चरणाचे दर्शन मला घडू दे. मला तुझ्या चरणाशी आश्रय दे.
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....