लहान मुलांच्या कलेतील जडणघडणीकडे लक्ष दिले पाहिजे. नाटकातून सर्वजण एकत्र येतात. संघभावना निर्माण होते. सध्या लहान मुलांसाठी चित्रपट बनत नाही. बालनाट्य लिहिणारे चांगले लेखक झाले पाहिजेत. पूर्वी गावोगावी एकांकिका होत होत्या. सध्या मात्र प्रमाण खूपच कमी झाले असून, शाळांमध्ये नाटक व कलेसाठी तास राखून ठेवला पाहिजे. बालनाट्य प्रशिक्षणासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्यकर्मी, महाराष्ट्र रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य डॉ. रमेश थोरात यांनी केले.
डॉ. सुनील गजरे लिखित तीन बालनाटिका या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अस्मिता कला अकादमीच्या अध्यक्षा श्रीमती वासंती गावंडे होत्या. यावेळी विचारवंत प्रशांत गावंडे, हास्य कलावंत किशोर बळी, खंडेलवाल इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य पूर्वा कुलकर्णी, सचिन गिरी, डॉ. सुनील गजरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नाट्य कलावंत गीता जोशी यांचा सत्कार करण्यात आला. अनिकेत गजरे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सचिन गिरी यांनी केले.
खेळण्या, बागडण्याच्या वयात मोबाईलमध्ये अडकलेल्या मुलांना सकस मनोरंजन देणे आवश्यक आहे. बालनाटिकांमधून मुलांचे चांगले प्रबोधन होऊ शकते. डॉ. गजरे यांची बालनाट्ये दिशादर्शक असल्याचे पूर्वा कुलकर्णी यांनी सांगितले. बालनाट्ये दुर्मीळ होत असून, ती पुनर्जीवित करण्याची गरज आहे. बालनाट्यामुळे अनेक मुलांच्या बुध्दीला चालना मिळून ती हुशार झाल्याची उदाहरणे आहेत. यामुळे बालनाट्याचा उपयोग शिक्षणासाठी देखील होऊ शकतो, असे विचार अध्यक्षीय भाषणात वासंती गावंडे यांनी व्यक्त केले. सध्या शासकीय शाळांची अवस्था बिकट असून, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शासनाने दखल घ्यावी, असे लिखाण व्हावे, अशी अपेक्षा प्रशांत गावंडे यांनी व्यक्त केली. प्रेक्षकांना खेळवून ठेवण्यासाठी लिखाणात ताकद असली पाहिजे. बालनाट्य व्यक्तीमत्व विकासाला चालना देणारी असावी. नेपथ्य, मेकअप, प्रकाश योजना यावर वारेमाप खर्च न करता समाज प्रबोधनाचा संदेश देता आला पाहिजे, असे डॉ. गजरे म्हणाले.
बालनाट्य चळवळ गतिमान व्हावी- बळी
बालकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजली पाहिजे. त्यादृष्टीने आता साहित्य लेखन होणे गरजेचे आहे. अकोला रंगभूमीमध्ये बालनाट्य चळवळ निरंतर सुरू आहे. ती अधिक गतिमान व्हावी, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा किशोर बळी यांनी व्यक्त केली.