पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या निर्णयामुळे देशात महागाई, बेरोजगारी आदी प्रश्न भेडसावत असुन यावर बोलण्याचा प्रयत्न लोकसभा व राज्यसभेत विरोधकांनी केला तर माईक बंद करून आवाज दाबण्याचे प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी, जनतेकडे जाण्यासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष, खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी पासून भारत जोडो यात्रा सुरू झाली आहे.
या यात्रेचे थेट प्रक्षेपण ग्रामीण भागातील जनसामान्य नागरिकांना सुध्दा बघता यावे यासाठी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावखेड्यात राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वतीने एलईडी स्क्रीन लावलेले रथ दाखल झाले असुन त्यावर भारत जोडो यात्रेचे थेट प्रक्षेपण नागरिकांना दाखविण्यात येत आहे. या यात्रेचे प्रक्षेपण बघण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक सुध्दा मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत.
भारत जोडो यात्रेची चर्चा फक्त भारत देशातच नाही तर जगभरात आहे. ही यात्रा देशाच्या भवितव्याला कलाटणी देणारी ठरणार आहे. यात्रेच्या निमित्ताने खासदार राहुलजी गांधी यांच नेतृत्व देखील फुलत असुन त्यांना जनसामान्यांच प्रेम व आशिर्वाद देखील लाभत आहे.
ग्रामीण भागातील प्रत्येक जनसामान्यांपर्यंत ह्या यात्रेबद्दल सर्व माहिती व्हावी, यात्रेतील प्रत्येक घडामोडी सुध्दा बघता याव्यात यासाठी एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण नागरिकांना दाखविण्यात येत आहे. त्यामुळे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील शहरांसह गावखेड्यातील प्रत्येक गल्लीत भारत जोडो यात्रेची चर्चा नागरिकांमध्ये होतांना दिसुन येत आहे.