वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : राज्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरुवात होणार आहे. उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळाला राज्य सरकार पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे. राज्यस्तरावर पहिल्या तीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला पाच, अडीच आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावरील समितीने निवड केलेल्या गणेशोत्सव मंडळापैकी राज्यस्तरावरील तीन गणेशोत्सव मंडळ वगळून ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी घेतली आहे, त्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धेत सहभागी होता येईल.
जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (महसूल) हे अध्यक्ष असतील. याशिवाय या समितीत शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी व पोलीस अधिकारी हे सदस्य तर जिल्हा नियोजन अधिकारी हे सदस्य सचिव असतील. जिल्हाधिकारी हे संबंधित अधिकाऱ्यांची नियुक्ती व त्यांचे समन्वय करतील. समिती ही स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उत्सव स्थळाला भेट देऊन पाहणी करून गणेशोत्सव मंडळाकडून व्हिडिओग्राफी व कागदपत्रे गोळा करून घेतील. जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येईल. जिल्ह्यातून प्रत्येकी एक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करून त्याची नावे, सर्व कागदपत्रे व्हिडीओसह राज्य समितीकडे जिल्हाधिकारी यांचेमार्फत १ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सादर करतील. या समितीसाठी करतील. या समितीसाठी प्रकल्प संचालक, पु.ल., देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी हे समन्वयक असतील.
राज्य समितीकडे जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या ४४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळापैकी ३ विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून उर्वरित ४१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी राज्य शासन २४ लाख ६० हजार रुपयांची बक्षीसे देणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या गणेशोत्सव मंडळाला जास्त गुण देण्यात येणार आहे. यामध्ये स्पर्धेसाठी पर्यावरणपूरक मूर्तीसाठी १० गुण, पर्यावरणपूरक सजावट ( थर्माकोल/प्लॅस्टिक विरहित) १५ गुण, ध्वनी प्रदूषणमुक्त वातावरणासाठी ५ गुण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन इ. या समाज प्रबोधन/ सामाजिक सलोख्यातील सजावट/देखाव्यासाठी २० गुण, स्वातंत्र्याच्या चळवळ संदर्भात/ शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने सजावट /देखाव्यासाठी २५ गुण, रक्तदान शिबिर,वर्षभर गडकिल्ल्यांचे संवर्धन, पर्यावरणाचे संरक्षण, सेंद्रिय शेती, सौरऊर्जेबाबत जागरूकता निर्माण करणे, रुग्णवाहिका चालविणे, व वैद्यकीय केंद्र चालविणे आदी प्रकारच्या सामाजिक कार्यासाठी २०, शाळकरी व महाविद्यालयाने
विद्यार्थी/ विद्यार्थिनी यांच्या शैक्षणिक व आरोग्य इत्यादीबाबत केलेल्या कार्यासाठी १५ गुण, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक/ आरोग्य सामाजिक/इत्यादीबाबत केलेले कार्य यासाठी १५ गुण, पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम/ स्पर्धा १० गुण, पारंपारिक देशी खेळांच्या स्पर्धा १० गुण, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा उदा. पाणी/ प्रसाधनगृह, वैद्यकीय प्रथमोपचार, वाहतुकीस अडथळा येणार नाही असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छता (प्रत्येक सुविधेस ५ गुण) यासाठी २५ गुण असे एकूण १५० गुण देण्यात येणार आहे.
वरील बाबींची पूर्तता करणाऱ्या/ करू शकणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने करावयाचा अर्जाचा नमुना ४ जुलै २०२३ च्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ मध्ये आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर ५ नोव्हेंबर २०२३ पूर्वी ऑनलाईन अर्ज करावे. प्रकल्प संचालक, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई यांनी प्राप्त झालेले जिल्हानिहाय अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास ८ सप्टेंबर २०२३ पूर्वी उपलब्ध करून द्यावेत.
आपल्या प्रतिक्रिया द्या....