चंद्रपूर:-
वाघांच्या शिकारीची टोळी देशपातळीवर सक्रिय आहे. या शिकार प्रकरणात आतापर्यंत १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या शिकार प्रकरणाच्या तपासाकरीता वनविभागाने स्पेशल टास्क फोर्स गठीत केली आहे.या टास्क फोर्स मध्ये कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गुवाहटी दरम्यान न्यायालयाच्या परवानगीने गुवाहटी येथील आरोपींना वन विभाग दोन दिवसात ताब्यात घेणार आहे.
वाघांच्या शिकारीचे जाळे देशात सर्वत्र पसरले आहे. वाघांची संख्या अधिक असलेल्या राज्यात हे शिकारी अधिक सक्रिय आहेत. आसाम राज्यातील गुवाहटी येथे आरोपींना अटक केल्यानंतर आता हळूहळू एकेक घटनाक्रम उघडकीस येत आहे. तेलंगाणा राज्यातील करीमनगर येथून अटक केलेल्या एकूण १३ आरोपींची सखोल चौकशी केल्यानंतर आणखी बरीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिकार प्रकरणी अटक केलेल्या १३ आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृह, गडचिरोली येथे करण्यात आली आहे. देशातील विविध भागातील शिकारी टोळयां, शिकाऱ्यांची माहिती संकलित करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. महाराष्ट्रातील विशेष कृती दलाचे मोठे यश आहे.आरोपींच्या पुढील तपासातून सावली परिक्षेत्रा अंतर्गत वाघांची शिकार झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. याबाबत सुध्दा नव्याने वनगुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास चंद्रपूर वनविभागाची चमू व विशेष कृती दल यांचेद्वारे करण्यात येत आहे.आसाम येथील अटक करण्यात आलेले ३ आरोपींना देखील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गडचिरोली यांचेकडील परवानगीने पुढील दोन दिवसात गुवाहटी येथील कारागृहातुन ताब्यात घेण्यात येणार आहे. आजपर्यंत वाघ शिकार प्रकरणात १९ आरोपींचा समावेश दिसून आला असून देशपातळीवर देखील आणखी काही आरोपी असल्याची शक्यता तपासाअंती समोर आली आहे, त्याबाबत देखील पुढील तपास सुरु आहे. तपासासाठी गठीत केलेल्या टास्क फोर्स मध्ये प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महिप गुप्ता, श्रीमती जयोती बॅनर्जी, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती, डॉ. जितेंद्र रामगावकर, वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, रमेशकुमार, वनसंरक्षक, गडचिरोली वनवृत्त, पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, नीलोत्पन, पोलीस अधिक्षक गडचिरोली, श्री. कुशाग्र पाठक, उपसंचालक (बफर), नंदकिशोर काळे, उपसंचालक (कोर), मिलीश दत्त शर्मा, उपवनसंरक्षक, गडचिरोली वनविभाग, बापू येळे, सहाय्यक वनसंरक्षक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, सोनल भडके, सहाय्यक वनसंरक्षक, गडचिरोली, आदेशकुमार शेंडगे, सहाय्यक वनसंरक्षक, श्रीमती स्वाती महेशकर, वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रपूर व गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी नागभिड, सायबर सेल मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील आकाश सारडा, . मुकेश जावरकर, दिनेश केंद्रे व स्थानिक पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....