मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सामाजिक कार्यकर्त्याना सन्मानित करण्याची हभप लोमेश महाराज चौधरी यांची शिंदे सरकारकडे मागणी.
वाशिम/मानोरा: आपल्या सभोवतालच्या समाजातील जनता जनार्दनाच्या हिताकरीता अहोरात्र धडपडणाऱ्या,समाजाचे प्रबोधन व जनजागृती करणाऱ्या, व्यसनाधिन समाजाला व्यसनमुक्त करणाऱ्या, महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यातील, नि:ष्पक्ष व निःस्वार्थी समाजसेवकांचे मनोबल उंचावण्याकरीता,त्यांचे पाठीवर कौतुकाची थाप म्हणून,महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुक्रमे,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, राजर्षी शाहू महाराज जयंती इत्यादी पर्वावर समाजसेवकांना महाराष्ट्र शासनाच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्याची आपल्या वैभवशाली राज्याची परंपरा आहे. परंतु गेल्या चार वर्षापासून म्हणजेच इ सन 2019 पासून, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाला याचा पुरस्कार समारंभाचा विसर पडल्याचेच दिसून येत आहे. विशेष म्हणजे सन 2018-2019 व 2019-20 या वर्षात सामाजिक न्याय विभागाकडून महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यामधून, जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत, विविध पुरस्कारा करीता , सामाजिक कार्यकर्त्याचे प्रस्ताव मागविण्यात आलेले होते. परंतु शासनाकडून अद्याप पर्यंत पुरस्कार समारंभच घेण्यात आला नसल्यामुळे,आगामी निवडणूकांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांना सन्मानित करण्याची मागणी मानोरा येथील, श्री गुरुदेव सेवाश्रम गुरुकुंज मोझरीचे सेवाधारी प्रचारक हभप लोमेश पाटील चौधरी यांनी केली आहे.