अधिकारी म्हणजे सामाजिक अंतर राखणारा माणूस. नोकरी आणि घर असं चाकोरीबद्ध जीवन जगण्यातच धन्यता मानणारा तो. त्यामुळे कदाचित अधिकाऱ्यांना असेच राहावे लागत असेल अशी माझी समजूत होती. पण उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे सरांशी भेट झाली अन् जस जसा सहवास वाढला तेव्हा जाणवले की अधिकारीही माणूसच असतात, ते ही तुमच्या आमच्यासारखेच.
जेव्हा जेव्हा मी त्यांच्यात रमलो तेव्हा तेव्हा ते आपल्यातीलच एक असल्याची जाणीव झाली. विशेष म्हणजे हा माणूस (अधिकारी शब्दात परकेपणाचा भाव उमटतो म्हणून माणूस हा शब्दप्रयोग ) बाहेर असला की ऑफिस कधी डोक्यात ठेवत नाही. प्रत्येकाबद्दल आत्मीयता जोपासणे हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य आहे. म्हणून ते कधी आपले आणि आपण कधी त्यांचे झालो हे कळलेच नाही. कदाचित नितीनभाऊ, आशिषभाऊ, शिवाजी दादा यांचीही हीच भावना असेल असे मी समजतो.
क्रीडाक्षेत्र खऱ्या अर्थाने सर्वांना जवळ आणते. धावणे हा आमच्यातील "कॉमन" दुवा ठरल्याने वऱ्हाडे सरांशी ओळख व पुढे मैत्री झाली. डोबऱ्यात उड्या मारणाऱ्यांना त्यांनी मॅरेथॉनचे जग दाखवले आणि धावण्याचा आमचा प्रवास अतिशय मनोरंजक व आव्हानात्मक केला. त्यामुळेच मैत्रीच्या नात्याला नवीन आयाम मिळाला. विशेष म्हणजे लांबच्या धावण्यामुळे किंबहुना त्यांच्यामुळे आमची आमच्याच गावात आम्हाला नवीन ओळख प्राप्त झाली. परंतु, ट्विस्ट केवळ चित्रपटांमध्येच येत नाहीत तर ते कधी कधी वास्तविक जीवनही बदलवून टाकतात. सरांच्या बदलीमुळे सध्या मीच नव्हे तर त्यांचे तमाम चाहते बेचैन आहेत. केवळ ११ महिन्याच्या कालावधीत शासनाने त्यांची बदली केली आहे. येत्या सोमवारी ( ११ मार्च) ते नांदेड येथे रुजू होतील.
भावी आयुष्यासाठी सरांना खूप खूप शुभेच्छा
मैत्रीचा हा विणलेला धागा उसवू देऊ नका, ही प्रामाणिक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.