वाशिम : "नवतरूणांनो "द" दारूचा नव्हे तर "द" दुधाचा आहे. दुधाने शरीर सशक्त होते तर दारूने शरीर खंगत जाते. शिवाय घरदार, , संपती आणि इज्जतीचा ही कचरा होतो."
आजचा तरुण व भावी पिढी म्हणजे आपल्या देशाची संपत्ती आहे. परंतु तरूणाईमध्ये सुद्धा दिवसेंदिवस व्यसनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसत आहे. एकतीस डिसेंबरला नववर्षाच्या स्वागतासाठी तरूणाई आतुरलेली असते आणि त्यांच्या स्वागतासाठी विविध प्रकारचे बिअरबार व दारूचे दुकाने आकर्षक रोषनाईने सजलेले असतात . दुकानदारांकडूनही,एका बाटलीवर एक फ्री अशा प्रकारचे आमिश दाखवले जाते . नवीन वर्षाचे स्वागत करायचे व जुन्या आठवणी विसरून जायच्या म्हणून नवनवीन मित्र एकत्र बसून पहिला दारूचा अनुभव घेतात व तेथून नववर्षाच्या प्रारंभीच आपल्या सुखमय जीवनाच्या सत्यानाशाला प्रारंभ करीत असतात. व्यसन करणे ही प्रतिष्ठा समजतात मित्रांनो. नवीन वर्षाचे स्वागत करायचे तर एकमेकांना गुलाब पुष्प भेट देऊन, पेढे वाटून साजरे करा.
हे सांगण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाशिम जिल्हा शाखेच्या वतीने विविध शाळा , महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांसमोर व्यसनाचे दुष्परिणाम सांगणारे पोस्टर्स प्रदर्शन व जाणिवजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. "दारू ही माणसाचे माणूसपण तर हिरावतेच शिवाय संपुर्ण घरादाराचे व इतर स्थावर व जंगम मालमत्तेचे नुकसान देखील करते." व्यसनाधिन व्यक्ती ह्या पत्नी मुलाबाळांसह आई,वडील आणि परिवाराला सतत त्रासदायक ठरतात.जगात व्यसन केल्याने माणूस सुखी झाला असे एकही उदाहरण नाही. आणि म्हणूनच व्यसनी व्यक्तीच्या कर्माचे फळ अख्खं कुटुंब भोगत असते हे समजून देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व मूकनायक विचार मंच वाशिमच्या वतीने दरवर्षी प्रबोधन रॅलीचे आयोजन करण्यात येते.
शहरातील प्रतिष्ठित महिलाच्या हस्ते दारूच्या प्रतिकात्मक बाटलीला बुटाचप्पलाचा हार घालून व्यसनाला बदनाम करून चौकाचौकात पथनाट्य व व्यसन विरोधी गीत गायन करून जमलेल्या व्यसनाची होळी करण्यात येते या अभियानात जिल्ह्यातील कलाकार, राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे, शेषराव पाटील इंगोले आणि वाशिम येथील कलाकारांसह अनेक व्यक्ती सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष पी. एस. खंदारे यांच्या नेतृत्वात विवीधरंगी वेशभूषा करून इतरही कलाकार सहभागी होणार आहेत. तरी जिल्हयातील नागरिकांनी व्यसनमुक्ती अभियानात सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष पी. एस. खंदारे, अध्यक्ष डाॅ रामकृष्ण कालापाड, राजु दारोकार, दत्ताराव वानखेडे, सुखदेव काजळे यांनी केले आहे.