महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून केला. पतीची हत्या करून महिलेने त्याचा नैसर्गिक मृत्यू असल्याचे दाखवले पण मृतकाच्या नातेवाईकांना संशय आल्यामुळे या हत्याकांडाचा उलगडा झाला.
गोंदिया:-
प्रेमासाठी कुणी कुठल्या थराला जाईल हे सांगाता येत नाही. गोंदियामध्ये एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा खून केलाय. या घटनेमुळे गोंदिया हादरले आहे. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील इसापूर येथील ही घटना आहे. इन्स्टाग्रामवरून झालेली ओळख नंतर एकमेकांच्या प्रेमात वेडे झालेल्या या दोघांनी प्रेमासाठी सर्व सीमा ओलांडल्या. महिलेने प्रियकराच्या मदतीने गळा दाबून आपल्या पतीची हत्या केली. आधी नैसर्गिक मृत्यू असल्याचे दाखवण्यात आले पण मृतकाच्या नातेवाईकांना संशय आल्यामुळे या हत्याकांडाचा उलगडा झाला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना देखील बेड्या ठोकल्यात.
गोंदिया जिल्ह्यातील इसापूर येथील हत्या प्रकरणाला वेगळे वळण आले असून मेघश्यामचा खून प्रियकराच्या मदतीने केला असल्याची कबुली मृतकाच्या पत्नीने दिली आहे. या महिलेच्या प्रियकराला पळून जात असताना यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद येथून पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा झाला. दोघांनी देखील कशापद्धतीने प्रेमात अडसर ठरणाऱ्या घनश्यामचा काटा काढला हे सांगितले. हा संपूर्ण घटनाक्रम ऐकून पोलिसही चक्रावले.
मृतक मेघश्यामची पत्नी वैशालीची इन्स्टाग्रामवर २ वर्षांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील तेजेराव गादगे (२२ वर्षे) या तरुणाशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्री आणि नंतर प्रेमात झाले. मग काय प्रेमात अडसर ठरलेल्या मेघश्यामला संपविण्याचा कट दोघांनी रचला. वैशालीने तेजेरावला गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी येथे बोलावून घेतले. प्रेयसीने बोलावल्याप्रमाणे तेजेराव दुपारी इसापूर येथे आला. दिवसभर तो याठिकाणीच कुठेतरी थांबला. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास तो मेघश्यामच्या घरी आला.
वैशालीने तेजेराव येणार म्हणून घरामागचे दार उघडे ठेवले होते. तेजेरावने घनश्यामच्या घरात मागच्या दाराने प्रवेश केला. ठरल्याप्रमाणे दोघांनीही मेघश्याम रात्री झोपला असताना त्याचा गळा आवळून खून केला. सकाळी उठल्यानंतर मेघश्यामचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे भासविण्याचा प्रयत्न वैशालीने केला. मात्र मेघश्यामच्या नातेवाईकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी या घटनेचा छडा लावत मृतकाची पत्नी वैशाली आणि तिचा नांदेड जिल्ह्यातील प्रियकर यांना दोघांना अटक केली. आरोपींविरोधात भादवीच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करत पोलिस तपास करत आहे. दोघांनाही अटकेनंतर कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्यांना १८ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.