देव मनात नसतो. मनात भाव असतात. मंदिरातही देव नसतो, त्याची प्रतिमा असते. ती प्रतिमा मनात रुजवून तिची आराधना करुन तिच्या सहाय्याने आपल्या परमेश्वराला जागृत करा. संत तुकाराम महाराज म्हणतात की, "जशी ऊसात हो साखर, तसा देहामाध्ये ईश्वर । जसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी ।।" आपले मन गढूळ वासनेने भरलेले आहे. त्याला प्रथम स्वच्छ करा. मनाच्या आसनावर प्रभुला बसवा.
सच काम किया जगमें जिसने ।
उसने प्रभुनाम लिया न लिया ।।
अपने मनको बसमें जो किया ।
वो चारो धाम गया न गया ।।धृ।।
सच म्हणजे सत्य स्विकारणे. नेहमी सत्य बोलून वचन पाळणारा. सत्य म्हणजे खरेपणा. सत्य केव्हाही, कसेही, कुठेही सत्यच असते. ही पृथ्वी आहे, होती आणि असेलही. सूर्य होता, आहे आणि उद्याही असेल म्हणजेच हे सत्य आहेच ना. आपल्या धर्मात सत्याला, ज्ञानाला, प्रेमाला अमूर्त ईश्वराच स्वरूप मानले आहे. याचाच अर्थ सत्य म्हणजे ईश्वर. उदाः- अंधाऱ्या खोलीत प्रकाश आला की अंधार आपोआप नाहिसा होतो. अगदी तसचं एकदा सत्य समोर आलं की असत्य नाहिसे होते. जो खोट न बोलता नेहमी सत्य जर तो बोलत असेल तर त्याने ईश्वराचे नाव घेतले नाही तरी चालते असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात.
आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवल्याने विकारावर विजय मिळवणे सोपे होते. मन हे चंचल, अस्थिर असते, ते फुलपाखराप्रमाणे सारखे या विचारावरुन त्या विचारावर, या विकारावरुन त्या विकारावर असे तरंगत असते. मनाला जर आपल्या ताब्यात ठेवले तर चारो धाम नाही केले तरी चालते असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. "मन को धोया नही सिर्फ गंगा नहाने से क्या फायदा?" खरोखरच गंगेत स्नान केल्याने पाप धुतले जात नाही. पाप तर मनात, विचारात असतात. "मात पिता की सेवा की ही नही । फिर तिरथोमें जाने से क्या फायदा । मात पिता के चरणोमें चारोधाम है । आजा आजा यही मुक्ती का धाम है ।।" आपल्या मनाला विकारापासून जर मुक्त केले तर चारो धाम करिता गेले नाही तरी चालते कारण आई वडिलांच्या पायाचे दर्शन, सेवा करणे महत्त्वाचे आहे. आई वडिलांची सेवा हिच मुक्ती मिळण्याचे ठिकाण आहे असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात.
है जिसकी जबां पे प्रेम भरा ।
कटुता कटुता का दर्प नही ।।
हर मानव से समता जिसकी ।
वह मंदिर ध्यान किया न किया ।।१।।
प्रेम शक्ती आहे. प्रेम साहस आहे. प्रेम म्हणजे सफलता, प्रसन्नता आहे. कटुता म्हणजे राग, दुःख, वैमनस्य, शत्रुत्व किंवा संताप होय. दर्प म्हणजे घमंड, अहंकार, अभिमान, गर्व तुझ्यामध्ये नको. तसेच तुझ्यात राग, वैमनस्य, शत्रुत्व नको. राष्ट्रसंत म्हणतात की, ज्यांचे मुखात दुसऱ्यांबद्दल तसेच आई वडिल यांचे विषयी प्रेम जागृत होते तो मानव धन्य आहे. समता म्हणजे सर्व व्यक्तीला समान अधिकार, संधी मिळणे होय. प्रत्येक मानवा सोबत समतेने, सहानुभूतीने, दयाळूपणाने जो वागतो. अशा व्यक्तीने मंदिरात जाऊन ध्यान, साधना, आध्यात्मिक साधन करण्याची काहीही आवश्यकता नाही असे राष्ट्रसंत म्हणतात.
सेवा ही बना जिवन जिसका ।
बदला न चाहे दिलसे किसीका ।।
जो मस्त रहे अपनी धुन में ।
वह गुरु का मंत्र लिया न लिया ।।२।।
लहानपणा पासूनच आपल्या अंतिम क्षणापर्यंत सेवाच असे एकमेव आभुषण आहे. जे आपल्या जीवनाला सार्थक बनविण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावित असतो. सेवाभाव विरहीत मनुष्य जीवन निरर्थक आहे. निस्वार्थ सेवाभाव हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र आहे. निस्वार्थतेने केलेल्या सेवेने कुणाचेही हृदय परिवर्तन केले जाऊ शकते. "वैष्णव जन तो तेणे कहीये । जे पीड परायी जाने रे । पर दुःखे उपकार करे तो ये । मन अभिमान न आने रे ।।" सेवाभाव असल्याशिवाय कुठलेही पुण्य कर्म नाही. सेवेनेच दुसऱ्याचे हृदय जिंकले पाहिजे. म्हणून कुणाचही मन दुखवू नका. जसेः- भिंतीतून खिळा काढल्यानंतर छिद्र तसचं राहत. समाज सेवेच्या कार्यात मती गुंग झाली पाहिजे. "सेवा परमो धर्मः" ही आपली संस्कृती आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की, सेवामय जीवनाने दुसऱ्याचे हृदय जो जिंकतो, सदा सेवेत गुंग राहतो, त्याने गुरुदेवाचा मंत्र घेतला नाही तरी चालते.
सब एक बराबर है जिसको ।
सब संत और पंथसे प्रेम वही ।।
जिसके भाषण में झुठ नही ।
वह ग्रंथ का पाठ किया न किया ।।३।।
पृथ्वीवर असणाऱ्या प्राणीमात्रावर एकसारखे प्रेम जो करतो, तो मनुष्य धन्य होय. प्रेम जीवनाचा सार आहे. सर्वांबरोबर दया आणि प्रेमभाव ठेवून वागावे. सर्व संत हे परमेश्वर स्वरुप असतात. संतावर सुद्धा प्रेम करा. भक्ती प्रेम भावनेने भगवंताची साधना केली तर तो भक्ताला भेटतो. राष्ट्रसंत म्हणतात की, "प्रेम भक्तीविण कलियुगात नाही, साध्य काही" सर्व पंथावर प्रेम करा. म्हणजे सर्व लोकांसाठी प्रेम आणि सहानुभूती असणे होय. खरे प्रेम म्हणजे स्वतः दुसऱ्याच्या कल्याणासाठी जाणीवपूर्वक वृत्ती आणि वचनबद्ध असणे होय. राष्ट्रसंत म्हणतात, जो भाषण करताना खोट बोलत नाही. आई वडिलांसोबत कधीच खोट बोलत नाही, कितीही भांडण होऊ द्या, तरी तो कधीच खोट बोलत नाही. अशा व्यक्तीने ग्रंथाचा पाठ केला नाही तरी चालते. धर्मशास्त्र म्हणते की, धर्माच्या कार्यात कधीही खोटे बोलू नये. आजकाल राजकीय नेते, पुढारी खोट बोलून सत्ता हस्तगत करायला लागलेत. राष्ट्रसंत म्हणतात, "खोटा व्यापार जरा ना सोडी, तो देव कसा पावतो । झालेले मागे पाप धुवाया देवापुढे नवस देतो । तुकड्या म्हणे सत्य आचरणा वाचोनी । कोणीच ना मुक्त होतो ।।" सर्वांसोबत चांगला वागला, संत आणि पंथासोबत प्रेम भावनेने वागला आणि मुखाने कधीही खोटं बोलत नाही अशा व्यक्तीने ग्रंथाचा पाठ नाही केला तरी चालते.
यदि मौत भी आजाये इसी क्षणमें ।
या संकट पर्वत प्राय पडे ।।
तुकड्या कहे जो डरता न उसे ।
तब और का साथ लिया न लिया ।।४।।
मृत्यू हा जीवनाला विश्रांती देणारा आहे. मृत्यू जरी आला तरी त्याला सामोरे जा. आपल्यावर कोणतेही संकट आले तरी त्याला घाबरु नका. संकट आले तर त्याचा सामना करा, हिंमत ठेवा, एकटं उभं रहा. हे जग ज्ञान देत साथ देत नाही. "नाही रे नाही कुणाचे कोणी । अंती जाईल एकटाच । माझे माझे म्हणुनी । माझे नाही रे कोणी ।।" शेवटी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की, मरण आले तरी, पर्वता एवढे संकट आले तरी जो मनात भिती ठेवत नाही. त्याने कुणाचीही साथ घेतली नाही तरी चालते. त्याची साथ परमेश्वरच करीत असतो.
बोधः- चंद्रापासून त्याचे सौंदर्य आणि वैभव काढून घेतले, हिमालयाने बर्फाचा त्याग केला, समुद्राने आपली मर्यादा सोडली तरी मी माझ्या पित्याला दिलेले वचन मोडणार नाही. असे अयोध्या कांड रामायण मध्ये श्रीराम म्हणतात. "रघुकुल रीत सदा चली आयी । प्राण जाये पर बचन ना जायी ।।" श्रीरामाचा आदर्श ठेवून सत्य आत्मसात करा. कीर्तनकार, प्रवचनकार म्हणतात की, श्रीराम चरित्र आचरण करा पण श्रीकृष्णाचे चरित्र आचरण करु नका. माझे मते हे योग्य नाही. कृष्णाने राधेशी प्रेम केले. राधा आणि कृष्णाची प्रेमभक्ती आणि निष्ठा यावर आधारित होती. हे प्रेम कलियुगातील मानवी प्रेमापेक्षा वेगळे होते. कुणी म्हणतात की, कृष्णाने चोरी केली. श्रीकृष्णाला काय कमी होते. त्याला यशोदा दुध, लोणी पोटभर खायला देत होती. श्रीकृष्णाच्या सवंगडीना दुध लोणी खायला मिळत नसे. गौळणी मथुरेच्या बाजारात दुध, लोणी विकायला नेत असे म्हणून कृष्णाने त्याच्या मित्रांना दुध, लोणी खायला मिळावे म्हणून चोरी केली. रामाकडून सहनशिल, धैर्यशाली, सत्यवादी हे गुण घ्यावेत तसेच श्रीकृष्णाकडून प्रेम, त्याग, कर्तव्य, न्यायासाठी लढण्याची प्रेरणा घेऊ शकता. श्रीकृष्णाने गीता सांगितली मग गीतेचे आचरण आपण करावे.
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....