कारंजा : आर.जे. चवरे हायस्कूल व कॉन्व्हेंटमधील वर्ग सहावीचे २ विद्यार्थी व नववीचा १ विद्यार्थी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेत यशस्वी होऊन तृतीय फेरीसाठी पात्र ठरले आणि ही स्पर्धा त्यांनी यशस्वीपणे पूर्ण करून शाळेच्या शिरपेचात आणखी एक यशाचा तुरा रोवला. लेखी, प्रात्यक्षिक व मुलाखत या तीनही फेरीमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येते. ग्रेटर बॉम्बे सायन्स असोसिएशन तर्फे दरवर्षी. महाराष्ट्रामध्ये डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा घेतली जाते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्याकरिता या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. वर्ग सहावीचे पात्र विद्यार्थी - लक्ष नवल सारडा, माहीन शेख या विद्यार्थ्यांनी सिल्व्हर मेडल मिळवले. वर्ग नववीचा विद्यार्थी अथर्व लुंगे यानेही या स्पर्धेत सिल्व्हर मेडल प्राप्त करुन आपल्या शाळेला हा गौरव प्राप्त करून दिला.
या विद्यार्थ्यांना शाळेतील सायन्स शिक्षकांनी आपल्या तासिकेव्यतिरिक्त मार्गदर्शन केले त्यांच्या व विद्यार्थ्यांच्या मेहनतीने आजची ही यशाची कमान गाठली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कारंजा एज्युकेशन सोसायटी मा. सचिव, जे.सी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, आर.जे. चवरे हायस्कूल व कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.