एटापल्ली तालुक्यातील सूरजागड टेकडीवर लोहखनिजाच्या उत्खननासाठी पर्यावरण विभागाची मंजुरी घेण्यात आलेली नाही. यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने अहेरी न्यायालयात लॉयड मेटल्स कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे. त्यामुळे लोहखनिजाचे उत्खनन तत्काळ बंद करावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे. याबाबत जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी जिल्हाधिकारी संजय मीणा यांना निवेदन दिले आहे. भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूची अंतर्गत जिल्ह्याचा समावेश आहे. अनुसूचित क्षेत्र असल्याने कोणताही विकास प्रकल्प, खाणी सुरु करण्यापूर्वी स्थानिक ग्रामसभांचा ठराव होणे अनिवार्य आहे. मात्र, या नियमांना बगल देत सूरजागड पहाडीवर बेकायदेशीररित्या लोह उत्खननव वाहतूक सुरु आहे.
ग्रामसभांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला, पण तो डावलून येथे उत्खनन केले जात आहे. लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेड या कंपनीने सन २०११ नंतर पर्यावरण विभागाची आवश्यक ती परवानगी घेतली नाही. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चंद्रपूर कार्यालयाच्या वतीने अहेरी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. याचा हवाला देत लोह खनिज उत्खनन अवैध असल्याने ते तत्काळ थांबवावे, अशी मागणी जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी केली आहे.