श्री संत गजानन महाराज हे महाराष्ट्रातील महान संत असून लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. संत गजानन महाराज शेगांव नगरीत येण्यापूर्वी एक दिवस बाल अवस्थेतील गजानन महाराज अक्कलकोटचे स्वामी समर्थाच्या आश्रमात गेले असता समर्थांनी त्यांना ओळखले. काही दिवस अक्कलकोट राहिले. समर्थांनी सिद्ध पुरुष होण्याचा आशिर्वाद दिला. तेथून नाशिक येथे कपिलधारा तिर्थावर येऊन १२ वर्षे तपश्चर्या केली. त्यावेळी त्यांना रघुनाथदास महंतानी योग सिद्धी दिली. तेथून ते कारंजा लाड येथे बाळशास्त्री गाडगे यांनी आपले घरी आणले. तेथे खूप गर्दी झाली, पूजा विधी झाली, कपडे, अलंकार दान आले. या उपाधीला गजानन महाराज कंटाळले. तेथून ते मणिराम बाबाकडे बग्गी जावरा येथे आले. त्यांची संत मणिराम बाबाशी आध्यात्मिक चर्चा होत होती. नंतर तेथून अकोटला संत नरसिंग महाराज यांचेकडे आले. नरसिंग महाराजांनी समाधी घेण्याआधी त्यांना अष्टसिद्धी प्राप्ती शिकविली. अशाप्रकारे नरसिंग महाराज यांचे विनंतीवरुन शेगांव आले. शेगांव बुलढाणा जिल्ह्यातील ठिकाण. जुने नाव शिवगाव होते पुढे शेगांव नाव रूढ झाले. दि. २३ फेब्रुवारी १८७८ माघ कृष्ण ७, या दिवशी गजानन महाराज देविदास पातूरकर यांच्या घरासमोर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात होते. गाई-गुरांना पाणी पिण्याचे हौदात पाणी प्यालेत. बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दिसले, तोच दिवस प्रगट दिन होय. गण गण गणात बोते हे भजन गात असल्याने त्यांना गजानन नाव पडले. शेगांव येथे महाराजांनी भक्तांना मार्गदर्शन केले. नग्न दिगंबर वृत्तीच्या या अवलियांनी अनेक साक्षात्कार घडविले. लोकांना भक्ती मार्ग पटवून दिला.
मना भासे गजानन हा, खरा अवतार देवाचा ।
कराया कार्य जनतेचे, प्रगटला मानवी साचा ।।धृ।।
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या भजनातून म्हणतात, माझ्या मनाला असे भासत आहे की संत गजानन महाराज खरा देवाचा अवतार आहे. संत आपल्या सारखे सामान्य लोक होत परंतु त्यांनी भक्ती व आध्यात्मिक गोष्टींना जीवनात महत्त्व दिले. जनतेचे, भक्तांचे कार्य करण्यासाठी गजानन महाराजांनी मनुष्य जन्म घेतला. काही संतांनी संसार केला पण संसारात कधीच लिप्त झाले नाहीत. संत मोह मायेत अडकले नाही. संतांनी षडविकारांना ताब्यात ठेवले. संतांना सिद्धी प्राप्त असताना त्याचा मुळीच उपयोग केला नाही.
कुठे श्रीकृष्ण होऊनी, कुठे श्रीराम होऊनी ।
कुठे नरसिंह होऊनी, प्रगटतो नाथ प्रेमाचा ।।१।।
देव हा भक्तांकरिता प्रगट होत असतो. तो परमेश्वर कृष्ण म्हणून जन्माला आलास. कुठे सत्य वचनी श्रीराम म्हणूनी जन्माला आला. भक्त प्रल्हादाकरिता. खांबामधून नरसिंह अवतार घेऊन प्रगट झाला.
कुठे ज्ञानेश गुरु झाला, कुठे तुकया म्हणो आला ।
कुठे शेगांवी अवतरला, असा अवतार क्रम त्याचा ।।२।।
सर्वप्रथम संत ज्ञानेश्वर महाराजांनी अवतार घेऊन ज्ञानेश्वरी प्राकृतात लिहीली. संत ज्ञानेश्वरांचे अवतार कार्य पुढे चालविण्यासाठी संत तुकारामांनी गाथा लिहून अवतार कार्य पार पाडले. संत तुकारामांचे अवतार कार्य पार पाडण्यासाठी शेगांवमध्ये संत गजानन महाराज यांनी नग्न दिगंबर रुप प्रकट केले. असा अवतार क्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सांगितला. संताचे कार्य म्हणजे आपआपली कर्मे करून समाजाचे रक्षण करणे. लोक एकत्र आणणे हा धर्म म्हणजे खरी भक्ती असे संत सांगतात. "संत कृपा झाली, इमारत फळा आली" संत ज्ञानेश्वर हे भगवान कृष्णाचे अवतार तर संत तुकाराम महाराज जगतगुरुचा अवतार म्हणून ओळखतात. संत गजानन महाराज भगवान गणेश आणि दत्तात्रयाचे अवतार मानतात. संत गजानन हे भारतीय गुरु, संत आणि गूढवादी होते.
कुठे तो विश्वची नटला, कुठे सौंदर्यवत् झाला ।
तयाची अगाध ही लीला, कथाया खुंटते वाचा ।।३।।
संताच्या रुपाने हा परमेश्वर विश्वामध्ये रमला. राष्ट्रसंत म्हणतात. "विश्वची घर भासूनी, जीव हा होत सदा दंग । प्रगटतो भक्तीचा रंग, असा हा संताचा संग ।।" हे विश्वाच्या चालक प्रभु तुला माझा नमस्कार असो. तू एकटाच असून अनंतरुपी विश्वामध्ये नटला. तूच जग धारण करणारा, जगात भरुन उरला व सौंदर्यानै या निसर्गात सृष्टीचे नाटक सजविण्या करिता कणाकणात तूच आहेस. हे गजानना तुझी अगाध लीला वाचेने कथन कराविशी वाटते.
म्हणे तुकड्या प्रभु भक्ता, न भासे भेदची पहाता ।
तयाची सर्वची सत्ता, हरी नटला गमे साचा ।।४।।
संत गजानन महाराज आणि परमेश्वर यामध्ये कोणताही भेद भासत नाही. संत आणि परमेश्वर एकच रुप आहेत. संताची सर्व ठिकाणी सत्ता आहे. तोच कणाकणात व्याप्त आहे. संत मनाने जेथे राहतो तेथे मन सहज ठेवण्याची शक्ती अंगी येते म्हणजेच संतकृपा झाली समजावे. संतकृपा ज्याच्यावर होते तो स्वतः संतच बनतो. काम, क्रोध, लोभ, व्देष या विकारांनी ज्याला सोडले तो खरा संत म्हणजेच गजानन माऊली होय. संत बाहेरून म्हणजे शरीराने माणुस दिसतो वा माणसासारखा वागतो. तो आतून म्हणजे आनंदरुप असतो. राष्ट्रसंत म्हणतात, "संत समागम साधा । गडे हो ।।" संत समागम केले तरी ते कधीच वाया जात नाही. सर्व विश्वात परमेश्वर व्यापून उरला.
कुत्रा, गाय, घोडा ह्याच्यात भगवंत आहे हे गजानन महाराज यांनी पटवून दिले. भक्तांना गजानन महाराज यांनी प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घडविले. गजानन महाराजांच्या तिर्थाने जानराव देशमुख मरणोन्मुख स्थितीतून बरे झाले. महाराजांनी अनेकांचे गर्वहरण केले. गजानन महाराज सिद्ध कोटीला पोहचलेले संत होते. मिळेल ते खावे, कोठेही पडून रहावे, कोठेही मुक्त संचार करीत होते. "जगाच्या कल्याणा संताच्या विभुती, देह कष्टविती परोपकारी" आपण मूढजन संत चमत्कार करतात असे म्हणतो पण संत चमत्कार करीत नसतात. संतांनी जे बोलले ते होत असते. संत कुणाचेही प्रारब्ध बदलवू शकतात. राष्ट्रसंत म्हणतात, "भुलू नका हो चमत्कारा, जगी ही थापची सारी ।।" संत गजानन महाराजांना झुनका भाकर, मुळ्याच्या शेंगा, पिठीसाखर, हिरव्या मिरचीचा ठेचा, अंबाडीची भाजी, खिचडी आवडत असे. संत गजानन महाराज ऋषी पंचमी दि. ८ सप्टेंबर १९१० रोजी समाधिस्त झाले. श्री गजानन महाराजांचे वास्तव्याने शेगांव चैतन्याचे अलौकिक संतपिठ बनले. भक्त निवासाची उत्तम व्यवस्था, मंदिर परिसर स्वच्छ, भोजनाची उत्तम व्यवस्था, सेवा करणारे कर्मचारी, पारदर्शी कारभार, वारकरी मंडळीची शिस्त तसेच संत गजानन महाराजांची प्रसन्न मुद्रा पाहायची असेल तर शेगांवला जरुर जावे.
गण गण गणांत बोते । हे भजन प्रिय सद्गुरुते ।
या श्रेष्ठ गजानन गुरुते । तुम्ही आठवित राहा याते ।।
हे स्त्रोत्र नसे अमृत ते । मंत्राची योग्यता याते ।
हे संजिवनी आहे नुसते । व्यावहारिक अर्थ न याते ।।
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....