चंद्रपूर :- पोलीस बंदोबस्त सुरू असतांना चक्क बिअर शॉपीमध्ये जाऊन बिअर ढोसणाऱ्या दोन पोलीस शिपायांवर जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे.
उमेश मस्के व नरेश निमगडे अशी निलंबित पोलीस शिपायांची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक यांच्या या कारवाईमुळे कर्तव्यावर हयगय करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांत चांगलीच धडकी भरली आहे.
१२ जून रोजी ब्रम्हपुरी शहरात ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीसाठी आंदोलन सुरू होते त्यामुळे ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन शिवाय ब्रम्हपुरी उपविभागातील पोलिसांना बंदोबस्ताकरिता बोलविण्यात आले. यामध्ये तळोधी पोलीस स्टेशनमधील पोलिसांचाही समावेश होता. यात उमेश मस्के, नरेश निमगडे बंदोबस्तात होते.
आंदोलना दरम्यान मस्के आणि निमगडे हे तळोधी पोलीस स्टेशन येथील दोन पोलीस शिपाई बिअर ढोसताना आढळून आले. त्यामुळे त्या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत असणारा तिसरा कर्मचारी मद्य पित नव्हता. परंतु, तोही मद्य दुकानात गेल्याने त्यावरही दुसरी कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.