सुगंधित तंबाखूचे ट्रक जात असल्याची माहिती मिळाल्यावर चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे सुगंधित तंबाखूचे दोन ट्रक पकडण्यात आले आहेत. ही कारवाई रात्रीच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाने ( FDA) केली असून, यात एक कोटी अकरा लाख रुपये किमतीचा तंबाखू जप्त करण्यात आला.
अमरावती आणि नागपूर येथील दक्षता विभागाला या अवैध तंबाखूची माहिती मिळाली होती. त्यावरून चंद्रपूर - बल्लारपूर मार्गावर विसापूर टोल नाक्यावर सलग दोन दिवस दक्षता विभागाच्या पथकाने सापळा रचत तपासणी केली. प्राप्त माहितीनुसार शेवटी रात्रीच्या सुमारास संशयास्पद दोन ट्रक आढळून आले. त्याची तपासणी केली असता हा प्रकार समोर आला. दोन्ही ट्रक ताब्यात घेत बल्लारपूर पोलिसात (Police) तक्रार नोंदवण्यात आली. या दोन्ही ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात राज्यात प्रतिबंध असलेला सुगंधित तंबाखूचा साठा भरला होता.अनेक वर्षांपासून तंबाखू पुरवठा
जप्त केलेली सुगंधित तंबाखू बल्लारपूर येथील एका ठक्कर नावाच्या तंबाखू किंगचा असल्याची माहिती समोर येत असून, हा व्यवसायी गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात तंबाखू पुरवठा करीत आहे. स्थानिक व्यवस्थेला मॅनेज करून त्याने हा व्यवसाय विस्तारला. गडचिरोली जिल्ह्यातही या तंबाखूचा पुरवठा केला जात असल्याची माहिती आहे. सदर प्रकरणात बल्लारपूर पोलिसांनी अधिकृत प्रतिक्रिया अजून दिलेली नाही. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे अन्न व औषध प्रशासनाच्या स्थानिक कार्यालयाला या कारवाईची कोणतीही माहिती न देता अमरावती व नागपूर विभागाने ही कारवाई यशस्वी केली. आता मुख्य आरोपीला केव्हा अटक केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.