वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : कारंजा ते अमरावती
रस्त्यावर धनज येथे स्थिर सर्वेक्षण पथक स्थापन करण्यात आले असून या पथकाने वाहनांची तपासणी करून आज ३० मार्च २०२४ रोजी तीन वाजेच्या सुमारास अमरावती कडून येणाऱ्या एमएच २७ बीएक्स १०५६
या टोयोटा एटीओस कारची तपासणी केली.
वाहनामध्ये पंकज पवन प्रेमानंद डोंगरे व मंगेश महादेव भागवतकर यांचेकडे ३६ लाख व १३ हजार अशी रोकड
आढळून आली. या वाहनाचे वाहन चालक नरेंद्र ढोले हे आहेत. वाहनातील व्यक्तींना रकमेविषयी विचारले
असता ही रक्कम एटीएम व बँकेमध्ये भरणे कामी घेऊन जात आहे व त्याबाबत आमच्याकडे निवडणूक
आयोगाची परवानगी व क्यूआर कोड असल्याचे सांगितले. त्या क्यूआर कोडला स्कॅन केले असता वरील
वाहनांमध्ये १६ लाख रुपये वाहतूक करण्याची परवानगी असल्याचे आढळून आले. या रकमेव्यतिरिक्त २०
लाख रुपये वाहतूक करण्याची परवानगी नसल्याने ही रक्कम संशयास्पद असल्याचे समजले.या घटनेची माहिती स्थिर
सर्वेक्षण पथकाने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कैलास देवरे व सहाय्यक खर्च निरीक्षक युसुफ शेख
यांना फोनद्वारे कळविली असता ही संशयास्पद रक्कम जप्त करण्याविषयी त्यांनी सांगितले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आचारसंहिता कालावधीत दहा लाखापेक्षा जास्त रक्कम
अवैधरित्या वाहतूक करत असल्याचे आढळल्यास याबाबतचा पुढील तपास आयकर विभाग करते म्हणून
याप्रकरणी पुढील तपास करण्यात कामी आयकर विभागाला पाचारण करण्यात आले आहे. आयकर विभाग
अधिकारी पोहोचेपर्यंत उपरोक्त वाहन पोलीस स्टेशन धनज या ठिकाणी आणण्यात आले आहे.
सदर कार्यवाही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी वाशिम बुवनेश्वरी, सहाय्यक निवडणूक
निर्णय अधिकारी कैलास देवरे, सहाय्यक खर्च निरीक्षक युसुफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली धनज येथील
स्थिर सर्वेक्षण पथकातील स्थिर सर्वेक्षण पथकातील सदस्य पुरुषोत्तम भगवान ठाकरे, ब्रह्मानंद निळकंठ राव
राऊत, गजेंद्र बापूराव पाखरे, अजय नारायण ढोके, सुनील मेहरे यांनी केली आहे.
भारत निवडणूक आयोगाचे आदेशानुसार अवैधरित्या रोख रक्कम, दारू अथवा वाटपासाठीच्या वस्तू आढळून आल्यास याबाबतची माहिती संबंधित
शासकीय यंत्रणांना देणे आवश्यक आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....