आरमोरी:-
नगरपरिषद आरमोरीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जिल्हा परिषद शाळा नगरपंचायत स्थापनेपासून ते आजपर्यंत नगरपरिषदेच्या अखत्यारीत घेण्यात आलेल्या नसल्याने त्या शाळांच्या देखभाल-दुरुस्ती व मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे या सर्व जि.प. शाळा तातडीने नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्यात याव्यात, अशी मागणी नगरपरिषद आरमोरीचे नगरसेवक तथा भाजपा जिल्हा सचिव भारत बावनथडे यांनी मुख्याधिकारी प्रीतीश मगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित शाळांमध्ये अद्याप पुरेशी विद्युत व्यवस्था उपलब्ध नाही. तसेच अनेक शाळांच्या इमारती जीर्ण अवस्थेत असून स्वच्छता, सुरक्षितता व शैक्षणिक सोयी-सुविधांचा अभाव आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होत असून, याबाबत नगरपरिषद हद्दीतील नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत आहेत.
नगरपरिषद क्षेत्रातील शाळांचा सर्वांगीण विकास साधणे, आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच शासनाच्या ‘डिजिटल शाळा’ संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जि.प. शाळा नगरपरिषदेकडे घेणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यासाठी तात्काळ कार्यवाही करून संबंधित विभागाकडे आवश्यक प्रस्ताव सादर करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना मुकुल खेवले, सुरेश मने, रवींद्र मडावी, मिलिंद जुवारे, राकेश भोयर, सागर निंबेकर, ठामेश्वर मैंद, प्रतीक भोयर, शुभम आत्राम, सचिन देवतळे, गोरक्ष कुरुडकर, किशोर जंजालकर, रोहित एरणे, तेजस नवघडे, राजू जराते, घनश्याम नैताम, गौरव मेश्राम आदी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....