कारंजा: दुःखितांच्या आनंदाचा भाग होता आला पाहिजे अन भुकेल्यांच्या मुखी घास देता आला पाहिजे हे ब्रीद घेऊन आपली वाटचाल करणारी येथील एक ऊब जाणिवेची चॅरिटेबल ट्रस्ट यंदाच्या दिवाळीत तब्बल 251 निराधार कुटुंबाना मायेची ऊब देणार आहे. मिशन दिवाळी 2023 अंतर्गत हा उपक्रम विस्तारितपणे राबविण्याचा त्यांचा मानस आहे.
धकाधकीचे जीवन, समाजात वाढणारी हिंसात्मक प्रवृत्ती यासारख्या प्रकारामुळे मानवी संवेदना कमजोर होत चालली आहे. आपण भलं व आपलं कुटुंब भलं अशी संकुचित वृत्ती अनेकांमध्ये रूढ झाली आहे. मात्र अशा विपरित परिस्थितीतही काही घटना व प्रसंगातून मानवामधील संवेदनशीलपणा प्रतिबिंबित होत असते . अशीच एक संवेदनशील मनाची सामाजिक संघटना कारंजा शहरात मागील तीन ते चार वर्षापासून अतिशय गोरगरीब, पिडीत, वंचित कुटुंबाच्या भल्यासाठी काम करीत आहे. एक उब जाणिवेची चॅरिटेबल ट्रस्ट असे तीचे नाव असून, वाशिम, यवतमाळ, पालघर, अकोला आदी जिल्हयातील 100 निराधार कुटुंब त्यांनी आजवर दत्तक घेतले आहे. त्याअंतर्गत या कुटुंबाना विनाखंडीत घरपोच किराणा साहित्य, आरोग्याच्या सुविधा व कपडे दिले जात आहे. अगदी दोन, तीन निराधार कुटुंबाना सहाय करण्यापासून सुरू झालेला हा संस्थेचा उपक्रम अनेकांच्या मदतीमुळे हळूहळू मोठे स्वरुप घेत आहे. त्यामुळेच यंदाच्या दिवाळीत अशा तब्बल 251 निराधार कुटुंबाना किराणा साहित्यासह नवे कपडे देण्याचा त्यांचा मानस असून त्याकरिता मिशन दिवाळी 2023 अंतर्गत संस्थेचे सदस्य मागील महिन्याभरापासून झटत आहे. आजच्याघडीला संस्थेचे किराणा साहित्य व कपडयाची कीट तयार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून, गरजुंना ती दिवाळीपूर्वी वितरित केली जाणार आहे.
दरम्यान, आयुष्याची संध्याकाळ पाहणारे अनेक निराधार कुटुंबासाठी एक उब जाणिवेची चॅरिटेबल ट्रस्ट आशेचा मोठा किरण ठरत आहे. जीवनोपयोगी साहित्य मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद या संस्थेतील सदस्यांना कायम प्रेरणा देत आला आहे. त्यामुळेच दैनंदिन काम, कौटुंबिक जबाबदारी सांभाळून ते निस्वार्थपणे हे सामाजिक कार्य पार पाडत आहेत. त्याला अनेक संवेदनशील व प्रेमळ लोक आर्थिक सहावयाच्या माध्यमातून हातभार लावत चळवळ गतिमान करीत आहे, हे येथे उल्लेखनीय आहे .
चौकट --
माणुसकीचे बंध जपण्याचे नागरिकांना आवाहन
दरमहा किराणा, आरोग्य तथा कपडे खरेदी करणे आणि हे साहित्य निराधार कुटुंबाना वाहनातून नेऊन घरपोच पोहचवून देणे याकामी बरेचसे पैसे खर्च होतात. एक ऊब जाणिवेची चॅरिटेबल ट्रस्टमध्ये काम करणारे सदस्य सर्वसाधारण कुटुंबातील असल्याने त्यांना सातत्याने हा आर्थिक भार पेलणे शक्य होत नाही. त्यामुळे समाजातील संवदेनशील दानशूर लोकांना संस्थेने मदतीचे आवाहन केले आहे. दानशूर व संवेदनशील मनाचे व्यक्ती 120000693563 या कॅनेरा बॅंकेच्या कारंजा शाखेत रक्कम जमा करू शकतात, असे संस्थेचे नरेंद्र खाडे व मोहित गावंडे यांनी कळविले आहे.