वाघाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असल्याची घटना कोंढाळा – रवी जंगल परिसरानजीक आज सकाळी ६.३० च्या सुमारास घडली असल्याने गावातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सविस्तर वृत्त असे की,कोंढाळा येथील शेतकरी गवळीदास तिमाजी गुरनुले(४९) नेहमीप्रमाणे शेतावर शेतीच्या कामाकरिता गेले होते.आज २३ जुलै २०२२ रोजी रोवणी करायची आहे म्हणून सायकलने सकाळच्या सुमारास शेतावर शेतीची पाहणी करून गावाकडे परत येत असतांना दबा धरून असलेल्या वाघाने गवळीदासकडे धाव घेतली व चेहऱ्यावर व पाठीवर पंजा मारून गंभीर जखमी केला.लगेच गवळीदासच्या समयसूचकतेने हातात असलेली सायकल वाघावर मारली असता वाघ जंगलाच्या दिशेने पळाला.
सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना कळताच बघ्यांची गर्दी झाली व वनविभागाचे वनक्षेत्र सहाय्यक के.वाय. कऱ्हाडे व वनरक्षक सलीम सय्यद यांना सदर घटनेची माहिती देताच लगेच क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळ गाठून गवळीदास याला देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.