जिंतूर-परभणी रोडवरील पांगरी पाटीजवळ बस आणि टाटा सुमोचा मोठा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये टाटा सुमो चालकाचा जागीचं मृत्यू झाला असून चालकाचा मृतदेह चक्क स्टेरिंगमध्ये फसला होता.
April 22, 2022 by प्रशांत पाटील |
परभणी : बस आणि टाटा सुमोचा समोरा-समोर भीषण अपघात झाल्याची घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील पांगरी पाटीजवळ घडली आहे. अपघातामध्ये टाटा सुमो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये दोन्ही वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुनिल दत्तराव अंभोरे वय २८ वर्ष असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
असा झाला अपघात...
जिंतूर तालुक्यातील कडसावंगी येथील सुनिल दत्तराव अंभोरे हा टाटा सोमो वाहन क्रमांक एम.एच.२८ डि.५७७७ घेऊन परभणीच्या दिशेने जात होता. मात्र पांगरी पाटी जवळ परभणीहुन जिंतूर कडे येणारी बस क्रमांक एम.एच.२० बि.एल १७७७ यांच्यात समोरासमोर जोराची धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. तर त्यासोबतच टाटा सोमो चालक सुनील अंभोरे याचा ही जागीच मृत्यू झाला.
एका तासात काढला मृतदेह...
अपघाताची भीषणता इतकी होती सुमो चालकाचा मृतदेह चक्क स्टेरिंगमध्ये फसला होता. पोलीस व सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात, रूग्णवाहिका चालक विजय राठोड यांनी तब्बल एक तास परिश्रम घेऊन आपघातग्रस्तास वाहनातून काढून त्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डाॅ.अनीफ खान, सिस्टर गावीत, आदींनी तपासून सुनिल अंभोरे (वय २८) रा.कडसावगी ता.जिंतूर यास मृत घोषित केले असून या आपघातात चार चाकी वाहनाचे अतोनात नुकसान झाले आहे. या प्रकरणाची अद्यापही पोलिसांमध्ये नोंद करण्यात आलेली नव्हती.