वाशिम : श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशिम आणि आधार बहुउद्देशीय अल्पसंख्यांक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने झाकलवाडी येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचा समारोप उत्साहात पार पडला. 23 फेब्रुवारी ते 2 मार्च 2025 या कालावधीत शिबिराद्वारे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले.
या शिबिरात विद्यार्थ्यांनी गावात स्वच्छता अभियान, स्वच्छता रॅली तसेच क्षयरोग नियंत्रण जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन केले. त्याचप्रमाणे बालविवाह, व्यसनमुक्ती, कौटुंबिक हिंसाचार आणि क्षयरोग नियंत्रण यांसारख्या ज्वलंत विषयांवर पथनाट्य सादर करून लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली. तसेच, बौद्धिक सत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या माध्यमातून समाजसेवेचा उत्तम अनुभव घेतला आणि गावाच्या विकासात योगदान दिले.
समारोप कार्यक्रमास शिक्षक आमदार अॅड. किरणराव सरनाईक प्रमुख उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच लक्ष्मण गावंडे, ग्रामपंचायत सदस्य सय्यद याकूब, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय साळीवकर, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. मनीषा कीर्तने, कार्यक्रम अधिकारी प्रा. विजय वानखेडे तसेच झाकलवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
आधार बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी सय्यद युनूस, सय्यद नूर, विशाल कव्हर, अनंत ढोले, श्रावणी राजनकर, शामल राजनकर, सीमा शृंगारे, शितल भुरके यांनीही शिबिरात योगदान दिले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. डॉ. मनीषा कीर्तने यांनी केले, सूत्रसंचालन यश मागे, वैष्णवी पानझाडे, करण मिटकरी आणि दीक्षा खिल्लारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. विजय वानखेडे यांनी मानले.
विद्यार्थ्यांनी समर्पणभावनेने कार्य करत या शिबिराला यशस्वी स्वरूप दिले. समाजोपयोगी उपक्रमांतून गावाच्या विकासाला हातभार लावण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर प्रेरणादायी ठरले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....